अवश्य वाचा


  • Share

मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदी प्रकाश राठी उपाध्यक्षपदी गुरूनाथ बाप्ते यांची निवड

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर मर्चंट्स बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रकाश राठी आणि नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन गुरुनाथ बाप्ते सर्वांच्या सहकार्याने बँकेला नक्की अधिक उंचीवर नेतील असा विश्वास बँकेचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. मर्चंट्स बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. चेअरमन पदासाठी प्रकाश राठी यांचे नाव राजेश मालपाणी यांनी सुचविले. त्यांच्या सूचनेला राजेश करवा यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी गुरुनाथ बाप्ते यांचे नाव ज्ञानेश्वर करपे यांनी सुचविले त्यास संदीप जाजू यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. राठी आणि बाप्ते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर बँकेच्या तळमजल्यावरील सभागृहात झालेल्या सभेत बोलताना राजेश मालपाणी यांनी वरील उदगार काढले. यावेळी व्यासपीठावर मालपाणी यांच्यासह मावळते चेअरमन राजेंद्र वाकचौरे, व्हाईस चेअरमन सतीश लाहोटी, दिल्लीचे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी हितेश राजपाल, बँकेचे माजी अध्यक्ष ओंकारनाथ भंडारी,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम आदी उपस्थित होते. मर्चंट्स बँकेचा कारभार आम्ही सर्वजण विश्वस्ताच्या भूमिकेतून करीत असतो. प्रत्येक जण बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. एकदिलाने कारभार होत असल्याने सदैव प्रगतीपथावर असलेल्या मर्चंट्स बँकेला नूतन चेअरमन राठी आणि व्हाईस चेअरमन बाप्ते निश्चित आणखी समृध्द करतील. बँकेच्या नावलौकिकास साजेसे कार्य त्यांच्या हातून घडेल.’ असे श्री. मालपाणी भाषणात पुढे म्हणाले. नवनिर्वाचित चेअरमन प्रकाश राठी यांनी आपल्या भाषणात 29कोटींच्या ठेवी असलेल्या मोठ्या आर्थिक संस्थेची जबाबदारी किती मोठी आहे याची पुरेपूर जाणीव असल्याचे नमूद केले. भविष्यात बँकेच्या ठेवी 325 कोटींवर आणि कर्ज वाटप 230 कोटींवर नेण्याचा संकल्प आहे असे ते म्हणाले. राजेश मालपाणी ओंकार भंडारी यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्याने इथवर पोहोचलो असे सांगून माझे बंधू आकाश राठी याने लक्ष्मणा सारखी मला कायम साथ दिली. त्याचे मोल करणे केवळ अशक्य आहे. नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन गुरुनाथ बाप्ते यांनी आपल्या भाषणात आजचा प्रसंग आपल्या जीवनास कलाटणी देणारा आहे असे सांगितले. सर्व संचालक मंडळाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे निभावून नेण्याचा निश्चय त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळते चेअरमन वाकचौरे यांनी केले. यावेळी, गिरीश मालपाणी, लालाशेठ मणियार, राजू बिहाणी, मनीष मणियार , हितेश राजपाल, ओंकारनाथ भंडारी, राजेश करवा, रमेश दिवटे, रामनाथ मुंदडा, आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन संतोष करवा यांनी केले तर आभार मावळते व्हाईस चेअरमन सतीश लाहोटी यांनी मानले.