अवश्य वाचा


  • Share

15 फुट नाल्याची तीनफुट बनविली बंदिस्त गटार बिल्डरांना अतिक्रमणासाठी मिळाले मोकळे रान

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर, नगरपालीका व अतिक्रमण हे एक सुत्र बनले असुन शहरातील मोठ-मोठ्या बिल्डरांना पालीकेच्या मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून अनेक भुखंड लाटले आहेत. यात या बिल्डरांनी नद्या, गटारी, नाले यांनाही सोडले नाही. शहरातील मालदाड रोडवरील 15 फुटांचा नाला अतिक्रमण करून आता या नाल्याचे रूपांतर 3 फुटाच्या बंदीस्त गटारीत होत आहे. पालीकेच्या आशीर्वादाने अतिक्रमण करणार्‍यांना शहरात मोकळे रान मिळत असल्याचे दिसत आहे. संगमनेर शहरात, मालदाड रोडवरून वाहनाला मोठा नाला, नाटकी नाला, तसेच म्हाळूंगी नदी लगत असणारा लेंडी नाला असे मोठ मोठे नाले होते. मात्र पालीकेचे दुर्लक्ष तसेच नगरसेवक व अधिकार्‍यांशी मिलीभगत करून आज या मोठ्या नाल्यांचे रूपांतर दोन फुट, तीन फुट छोट्या गटारीमध्ये झालेले दिसत आहे. मालदाड रोड वरील आजची गटार हा काही वर्षापुर्वी मोठा नाला होता. घुलेवाडी, मालदाड या गावच्या हद्दीतुन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या नाल्यातुन पाणी वाहत होते. व पुढे जाऊन हा नाला नाटकी नाल्याला मिळत होता. मात्र आज हा नाला अनेक ठिकाणी नामशेष झाला आहे. सौभाग्य मंगल कार्यालय ते शिवाजी नगर पर्यंत हा नाला काही प्रमाणात शिल्लक होता. मात्र आता शहरातील एका नामवंत बिल्डराने नाला गिळंकृत करण्यासाठी पालिकेला हाताशी धरून मोकळा नाल्याची बंदीस्त गटार केली जात आहे. काही वर्षापूर्वी या नाल्यालगत मोठी जागा होती ही जागा सरकारची पर्यायाने पालिकेची होती. मात्र येथील अनेक नागरीकांनी, धनदांडग्यांनी, राजकारण्यांनी हळूहळू ही जागा हडप केली त्यामुळे पुर्वीच्या नाल्यांचे आज अस्तित्व संपले असून आता ही केवळ एक गटार म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे व या नाल्यावर झालेल्या प्रचंड अतिक्रमणामुळे पुराचे सर्व पाणी शहरात घुसले होते. नाटकी नाल्यावर ही प्रचंड अतिक्रमणामुळे हे पाणी बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये नविननगर रोड वरील मोठ मोठ्या दुकानात शिरले व व्यापार्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. तसेच नाटकी नाल्यालगत राहणार्‍या अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसून अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते तर अनेक जणांवरही दगावले होते. ही आपत्ती केवळ या नाल्यांवरील झालेल्या अतिक्रमणामुळे शहरावर आली होती असे असतांनाही शहरातील महत्वाच्या नाल्यांवर व गटारीवर आजही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. मात्र पालिकेचे त्याकडे साफ दुर्लक्ष होतांना दिसत आहे. पालिकेच्या या दुर्लक्षामुळे अनेक ठेकेदारांना, बिल्डरांना मोकळे रान मिळत आहे. पालिकेची अतिक्रमण मोहिमही कामयच गरीबांच्या मुळावर उठत असते. मात्र अशा पध्दतीने अनेक ठिकाणी नाले गटारी, सरकारी जागा हडप करणार्‍यांना मात्र सोडले जाते. आज मालदाड रोडवरील हा मोठा नाला बुजविला जात असून भविष्यात कोणतीही आपत्ती उद्भवली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्‍न निर्माण होत आहे.