अवश्य वाचा


  • Share

प्राथमिक शिक्षक बँकेचा भ्रष्ट कारभाराबद्दल सदस्यामध्ये संतापाची लाट

संगमनेर (प्रतिनीधी) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार अत्यंत भ्रष्ट व मनमानी पद्धतीने चालला असून त्यामुळे शिक्षक सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. मिस्टर क्लिनची प्रतिमा मिरवून सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन सत्ता हस्तगत करणार्‍या रावसाहेब रोहोकले यांनी स्वतःच्या नातेवाईकांना बँकेच्या नोकरीत घेऊन स्वहीत साधल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.वृषाली कडलग यांनी केला आहे. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले व संचालक मंडळाने वार्षिक सभेत सभासदास पहिले कन्यारत्न झाल्यास अकरा हजार रुपये देणगी देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मुलगी झालेल्या सभासदास संचालक मंडळाने वाटाण्याच्या अक्षता लावून जिल्ह्यातील स्त्री सभासदांचा अवमान केला आहे. रोहोकले नेहमी स्त्री दाक्षिण्यावर बोलत असतात. त्यांना खरोखरच स्त्रीयां विषयी आदर असेल तर चेअरमन पदाच्या खुर्चीला चिटकून न राहता त्यांनी स्त्री संचालिकेस चेअमन करावे म्हणजे खर्‍या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान होईल असे ही कडलग यांनी म्हटले आहे. सत्तेवर आल्यापासून जिल्ह्यातील स्त्री सभासदांना भावणीक करून रोहोकलेंनी मते लाटली प्रत्यक्षात मात्र एकही शब्द पाळतांना ते दिसत नाहीत. स्त्रीयांना बँकेचा कारभार समजत नाही असे या संचालक मंडळाची धारणा झालेली दिसते. सत्तेत आल्यापासून या मंडळाने कर्जावरील व्याजदर अर्ध्या टक्क्यानेंही कमी केलेला नाही उलट वाढीव कर्जावर तेरा टक्के व्याज आकारल. ठेवी वरचे व्याज सात टक्के देऊ असा शब्द दिलेल्या रोहोकले यांनी प्रत्यक्षात पाच टक्केच व्याजदर दिला. बँकेत काटकसर करून पैसे वाचविले असे हे संचालक मंडळ म्हणत असेल तर वाचवलेले पैसे सभासदांपर्यंत न पोहोचता नेमके कुणाच्या घरात गेले याचा ही खुलासा या संचालकांनी जिल्ह्यातील स्त्री सभासदांना द्यावा. बँकेमध्ये काम करणारे पारनेरचे बडे व श्रीगोंद्याचे प्रवीण दरेकर या तरुण कर्मचार्‍याचा मृत्यु झाला, त्यांच्या विधवा पत्नीस नोकरीत घेतले असते तर त्या स्त्रीयांनी स्वबळावर आपले कुटुंब उभे केले असते. परंतु रोहोकले यांनी आपल्या जवळचे नातलग असलेल्या मंगेश ठुबे या एका शिक्षक नेत्याच्या मुलास नोकरीत घेऊन स्वतःचा ही स्वार्थ साधला. आम्ही विरोधक असलो तरी एक स्वच्छ प्रतिमेचा भाऊ सत्तेत आल्याने आम्ही गप्प होतो. परंतु ही प्रतिमा फसवी निघाली. अस्वच्छ व मनमानी हुकुमशाही पध्दतीचा कारभार करून जिल्ह्यातील सर्वच सभासदांना त्यांनी फसवीले आहे. वार्षिक सभेत गोंधळ झाल्यानंतर रोहोकले यांनी नारीशक्तीस पुढे करून सभा शांत करण्यासाठी त्यांचा अस्त्र म्हणून वापर केला. आता हीच नारीशक्ती त्यांना त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असे ही कडलग यांनी म्हटले आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधार गुरुकुल महिला आघाडी तिव्र आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहे. असा इशारा गुरुकुलच्या मिना साबळे, संगीता कडुस्कर, प्रतिमा नागरे, स्मिता जाधव, मनिषा पवार, जयश्री झरेकर, सारीका खेतमाळस, कल्पना खराटे, पल्लवी मेहेत्रे, जयश्री मुकणे, मिनाक्षी जाधव, सुचीता मैड, संगीता बर्डे, कल्पना बाविस्कर, गीता रासणे, अंजली महामर, स्मिता रसाळ, मनिषा लबडे, कविता रोहोकले, गंगा पांडुळे, संगीता घुले, आशा थोरात यांनी दिला आहे.