अवश्य वाचा


  • Share

नापिकी, कर्ज, दुष्काळ व सरकारी उदासिनतामुळे संगमतनेर तालुक्यातही पसरले शेतकरी आत्महत्येचे लोण

संगमनेर (प्रतिनिधी) जलसिंचनाच्या अपुर्‍या सोयी सुविधा, सातत्याने पडणारा दुष्काळ, वाढता कर्जबाजारीपणा, शासनाचे धरसोड उदासिन धोरणामुळे मराठवाडा, विदर्भ या भागातील शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आत्तापर्यंत या भागात लाखो शेतकर्‍यांनी आपली जीवन संपविली आहे. दरम्यान शेतकर्‍यांच्या या आत्महत्येचे लोण आता संगमनेर सारख्या सधन तालुक्यात पोहचले असून गेल्या दोन तीन वर्षापासून अनेक शेतकर्‍यांनी मरणाला जवळ केले आहे. शनिवारीही तालुक्यातील वडगाव लांडगा येथील एका शेतकर्‍याने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. शेती हा शाश्‍वत व्यवसाय आता राहिला नाही. शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा फायदा हा व्यापार्‍यांना होतो मात्र भाव गडगडल्याच त्याचा तोटा मात्र शेतकर्‍यांनाच होतो. शेतकरी निसर्गाच्या भरवश्यावर शेतात पिके घेतो. त्यासाठी विविध कंपन्यांची महागडे, बि-बियाणे, औषधे फवारणी करतो. रात्र-रात्र जागून शेतात पाणी भरतो, मशागत करतो मात्र अनेक वेळा कधी निसर्ग धोका देतो तर कधी बि-बियाणे दगा देतात. कधी रोगामुळे पिके जातात तर कधी पाणी तर कधी अतिवृष्टी या सर्व परिस्थितीतही शेतकरी न डगमगता शेतात उभा राहतो. कर्ज काढून पुन्हा नव्या जोमाने शेती उभी करतो चांगले पिकही घेतो मात्र बाजारभाव कोसळतो आणि पुन्हा शेतकरी अडचणीत येतो. हे दुष्टचक्र सातत्याने सुरू असते. मात्र सरकारही केवळ सहानुभूती व आश्‍वासनाच्या पलीकडे काम करीत नाही. शेतकर्‍यांसाठी ज्या अर्थसंकल्पात हजारो कोटी रूपये दाखविले जातात प्रत्यक्षात त्यातील किती पैसा हा थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहचतो हा संशोधनाचा विषय आहे. सध्या दुष्काळ, नापिकी व बाजारभावाअभावी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी कर्जमाफीसाठी संपूर्ण अधिवेशनात गोंधळ घातला. मात्र फडवणीस सरकारने कर्जमाफी दिली नाही. उलट शेतकर्‍यांना सक्षम करून म्हणत पुन्हा गाजर दाखविले. शेतमालाला कोणताही हमीभाव नाही. पाणी आहे तर वीज नाही. विज आहे तर पाणी नाही अशा परिस्थितीत शेत करायची कशी आणि कर्जफेड करायची कसे या प्रश्‍नाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. त्यातही संगमनेर सारख्या सहकाराने समृध्द असलेल्या तालुक्यात तर शेतकर्‍यांची परिस्थिती त्या मानाने चांगली समजली जात होती मात्र गेल्या काही दिवसांपासून शासनाचे कृषी क्षेत्राकडे असलेले उदासिनतेचे धोरण, केवळ आश्‍वासने यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. निधीअभावी निळवंडे चार्‍यांचा प्रश्‍न तसाच भिजत पडला आहे. आढळा, भोजापूर धरण व पाटचार्‍या प्रश्‍न गेल्या कित्येक दिवसांपासून सुटलेला नाही. आजही तळेगाव व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो यावरून शेतकर्‍यांच्या समस्यांची जाणीव होते. वडगाव लांडगा येथील शांताराम हांडे यांनीही नापीकी, कर्जबाजारीपणा व सरकारकडून झालेली अवहेलना यामुळे आपली जीवनयात्रा संपविली. जिल्ह्यात व तालुक्यात आत्तापर्यंत याच कारणावरून अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली व करत आहे. मराठवाडा व विदर्भातील हे आत्महत्येचे लोण जिल्ह्यात व तालुक्यात पसरू लागल्याने बळीराजाचे जगणे अवघड होतांना दिसत आहे.