अवश्य वाचा


  • Share

बंदीनंतरही संगमनेरात जोरात दारूविक्री

संगमनेर (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही संगमनेर शहर व परिसरात खुलेआम जोरात दारूविक्री सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर काल राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वतीने संगमनेर शहरात छापे टाकत सुमारे लाखांपेक्षा अधिक किंमतीची दारू पकडली. बंदीनंतर ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. दरम्यान ही कारवाई सुरू असतांना बार चालकांनी या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. संगमनेरमध्येही राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील अधिकार्‍यांनी कारवाईचा बडगा उगारला. महामार्गालगत दारू दुकाने बंद करण्याचे संकट ओढावल्यानंतर संगमनेरमधील सर्वच दारू विक्रीची केंद्रे बंद करावी लागली. उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी दारू विकेत्यांकडील मद्यांच्या साठ्याची तपासणी करत हे साठे सील केले होते. मात्र, यानंतरही दारूची विक्री चोरून लपून सुरूच होती. शहर पोलिस आणि दारुबंदीचे अधिकारी तपासणी केल्याचे सांगत दारू विक्री बंद असल्याचा निर्वाळा देत होते. मात्र, शनिवारी रात्री या पथकाने कारवाई केली. उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एम. डी. मिलानी, एस. के. पावसकर यांच्या देशी दारुच्या आणि हॉटेल चैतालीच्या परिसरात दारूची विक्री होत असल्याचे आढळले. उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले. विशाल नामदेव आव्हाड (वय 21) याला दारू विक्री करताना पकडले. अन्य ठिकाणच्या छाप्यात आरोपी पळून गेल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. निरीक्षक उत्तम बर्डे, दुय्यम निरीक्षक डी. डी. चौरे, ए. ई. तातळे एल. सी. परते, कर्मचारी आर. बी. कदम, विपुल कर्पे, सुधीर नागरे, शंकर लवांडे, व्ही. एम. पाटोळे, व्ही. एच. गवांदे, मोहिनी घोडेकर आदीं कर्मचार्‍यांचा या कारवाईत समावेश होता. दरम्यान, उत्पादन शुल्कचे अधिकारी कारवाईसंदर्भात माध्यमांना माहिती देत असताना तेथे आलेल्या दोन हॉटेल मालकांनी दारुबंदी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्हीच दारू विक्रीसाठी परवानगी दिल्याचे आणि दगाफटका करत कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे होते. अधिकार्‍यांकडे मात्र त्यांच्या प्रश्नाचे कोणतेच उत्तर नव्हते. थोडा माल काढत त्याची विक्री करण्यास त्यांनीच परवानगी दिली आणि कारवाई केली. पकडलेली दारू दोन नंबरची नसून त्यावर टॅक्स भरून ती विक्री केली जात असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तालुक्यातील 86 पैकी 81 बिअरबार व इतर दारू दुकाने बंद झाली असतांनाही पहिल्या दिवसांपासूनच या बंद दुकानातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या व चढ्या दराने दारू विकली केली जात आहे. याबाबत दै. युवावार्ताने सातत्याने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत काल राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने या अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई केली. दरम्यान या कारवाईनंतरही शहर व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे.