अवश्य वाचा


  • Share

लेखनाचा हेतू मार्गदर्शक असावा- माजी मंत्री खताळ

अकोले (प्रतिनिधी) कोणत्याही लेखनाचा हेतू मनोरंजनापेक्षा समाजाला मार्गदर्शन करण्याचा असावा.पुंडलिक गवंडी यांचे लेखन समाजाला मार्गदर्शक करणारे आहे. त्यांचे लेखन हे वाचनीय व अनुकरणीय आहे,’ अशा आशयाचे हे प्रतिपादन माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील यांनी केले. साहित्यिक पुंडलिक गवंडी लिखीत ’शेतकर्‍याच्या व्यथा’ (कविता संग्रह) व ’एक डोंगर संपला’ (कथा संग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये श्री खताळ पाटील यांच्या हस्ते झाले. तेंव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.ज्येष्ट विचारवंत प्रा.एस.झेड.देशमुख या कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांताद्यक्ष दशरथ सावंत, अभिनवचे अद्यक्ष मधुकरराव नवले, प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, प्राचार्य डॉ बी.एस.देशमुख, प्रा.विठ्ठल शेवाळे, प्राचार्य मगनराव येलमामे, प्रा.डी.के.वैद्य, भाऊसाहेब नाईकवाडी व साहित्यिक गवंडी उपस्थित होते. वयाची 99वी साजरी केलेले श्री खताळ यांना नुकताच ‘सा.रे.पाटील’ पुरस्कार मिळाल्याबद्धल व अभिनवचे उपाद्यक्ष विक्रम नवले यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्धल त्यांचा भावपूर्ण सत्कार केला गेला. साहित्यिकांचे मन हे संवेदनशील असते. त्यातून लेखनाची प्रसव वेदना सुरु होते असे सांगून श्री खताळ म्हणाले की, व्यसनाच्या आहारी जाणे म्हणजे गुलामगिरी होय. अशा अनेक प्रकारच्या गुलामगिरींनी आपले आयुष्य व्यापले आहे. महात्मा फुले यांनी आर्थिक व सामाजिक गुलामगिरी संपविण्याचा प्रयत्न केला.याकडे लक्ष वेधले. प्रा.एस.झेड देशमुख यांनी व्यथेतून कविता जन्माला येते. याकडे सर्वांचे लक्ष वेधले. शेतकरी आत्महत्या का करतो ? असा प्रश्न विचारण्यापेक्षा शेतकरी वर्गाचे समुपदेशन केले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. समाजात कोणाताही डावा अथवा उजवा विचार राहिलेला नाही. तर सर्व विचार हे उभे आडवे झाले आहेत. अशी मिश्कील टीपणी करून देशमुख म्हणाले, श्री गवंडी यांच्या लेखनात समाज प्रबोधन करण्याची क्षमता आहे. शेतकरी नेते दशरथ सावंत म्हणाले, बोकाळलेल्या ग्राहकवादाने शेतकरी वर्गाचे वाटोळे केले आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी ही बाबच आपण विसरलो आहोत असा टोला त्यांनी लगावला. मधुकर नवले म्हणाले, सरकार कोणत्याही पक्षाचे असो.मात्र शेतकरी प्रश्न सुटले पाहिजेत. प्राचार्य खांडगे, नगराद्यक्ष के.डी.धुमाळ यांची यावेळेस भाषणे झाली. तर साहित्यिक गवंडी यांनी पुस्तके लेखनामागील प्रेरणा स्पष्ट केली. प्रास्ताविक प्राचार्य मगनराव येलमामे यांनी केले. सूत्र संचालन प्रकाश आरोटे यांनी केले.प्रा.डी.के.वैद्य यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य शांताराम गजे, एस.टी.येलमामे, विजयराव पोखरकर, शिरीष देशपांडे, अपर्णा श्रीवास्ताव, अल्फांसो डी, दिलीप रोंगटे, माधव तिटमे, डॉ.संदीप कडलग, रावसाहेब शेटे, बाळासाहेब वडजे, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष सुनील वाळुंज, आदी मान्यवर उपस्थित होते.