अवश्य वाचा


  • Share

महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा कांद्याच्या हमीभावासाठी भव्य मोर्चा

संगमनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संतोष वाडेकर, जिल्हाध्यक्ष अनिल देठे पाटील, उपाध्यक्ष असिफ शेख, किरण वाबळे यांच्या नेतृत्वाखाली कांदा पिकासह सर्वच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, डॉ. स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात या मागण्यांसह शेतीपंपांना दिवसा व मोफत विज मिळावी तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर कालव्यांची कामे पुर्ण करण्यात यावीत यासाठी संगमनेर उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन गुरूवारी स.11.00 वा. करण्यात आले होते. मोर्चाचा प्रारंभ संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समिती जवळील यशोधन मैदानापासुन करण्यात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे फलक व झेंडे हातात घेऊन सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणुन सोडला. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर येऊन धडकताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या वेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक , अध्यक्ष संतोष वाडेकर यांनि सरकारच्या निष्क्रीय धोरणांवर टीका करत हे सरकार शेतकरी विरोधि असल्याने या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्नांचं गांभिर्य नसल्याचा आरोप केला. तसेच उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांना मात्र कर्जमाफी हे सरकार देतं आणि महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या करून देखिल भाजपा सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देत नसल्याने सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर अन्याय करत असल्याचे त्यांनि सांगितले. सरकारने जर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला नाही तर राज्यातील शेतकरी उध्वस्त होईल व पर्यायाने देशाला अन्नधान्य, भाजीपाला तुटवड्याच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा ते सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अन्यथा शेतकरी आता हवालदिल झाला असुन तो कुठल्याही क्षणी संपाचे हत्यार उपसेल व त्यासाठी संघटना पुढाकार घेईल असा ईशारा ही त्यांनी दिला. या प्रसंगी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल देठे पाटील यांनिही सरकारवर हल्ला चढ़वत केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासुन कांद्यासह सर्वच शेतमालाचे बाजारभाव कोसळले असुन त्यात अद्यापही सुधारणा होत नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड चिंतेच वातावरण असुन शेतकर्‍यांवर अक्षरशः जमिनी विकण्याची वेळ आली आहे व हे सरकार जाणिवपुर्वक शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असुन राज्यात सध्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून सत्ताधारी व विरोधक जे राजकारण करत आहेत ते फारच दुर्देवि असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या सरकारकडे उद्योगपतींना कर्जमाफी देण्यासाठी पैसे आहेत मग शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठीच नाहीत का असा सवाल त्यांनी केला. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याने त्यांचे प्रश्न कायमचे संपणार नसुन तो पुन्हा नव्याने शेतमालाच्या उभारणीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकांच्या दारात जाणारच आहे व शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यास तो पुन्हा कर्जबाजारी होणारच आहे त्यामुळे फडणवीस सरकारने शेतकर्‍यांना एकदा संपुर्ण कर्जमाफी देऊन शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागु कराव्यात कारण कर्जमाफी हा शेतकर्‍यांसाठी कायमचा उपाय नसुन शेतमालाला हमीभाव देणे हाच सर्वोत्तम व कायमचा उपाय ठरू शकेल. तरी सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा संघटना यापुढे शेतकर्‍यांचे संपुर्ण कुटुंब गुराढोरांसह रस्त्यावर उतरून राज्यभर अधिक तीव्र आंदोलनं करेल. संघटनेचे सचिव किरण वाबळे म्हणाले विद्यमान सरकारची शेतमालावरील निर्यात धोरणाची भूमिका धरसोड वृत्तीची राहिल्यामुळे कांद्याचे जे आयातदार राष्ट्र आहेत त्यांनी अन्य राष्ट्रांकडुन कांदा आयात करणे पसंद केले असल्याने त्याचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.व त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वेळी मोर्चात सहभागि झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांनिही मनोगतं व्यक्त करत सरकारबद्दल असलेली चीड तीव्र शब्दात मांडली.संघटनेच्या वतिने केलेल्या मागण्यांचे लेखि निवेदन संगमनेरचे उपविभागिय अधिकारी डोईफोडे सो व तहसीलदार सोनवणे यांना देऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला यावेळी पोलिस निरिक्षक गोविंद ओमाशे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात संगमनेर पंचायत समितीच्या सभापति निशिगंधा कोकणे व संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तुकाराम हासे , निलेश तळेकर , तालुका अध्यक्ष अनिल लांडगे , तालुका कार्याध्यक्ष गणेश गायकर , सुमित गाढवे , सोमनाथ हासे , अनिल गाढवे , संदिप जाधव , ज्ञानेश्वर गागरे , नंदू साळवे , रोहिदास धुमाळ , अभय हासे , अरूण शिंदे , सोमनाथ जगताप , राजु खतोडे , अभि घोलप ,संतोष गागरे , विनोद गागरे , प्रकाश नवले , अजय नवले यांच्यासह संगमनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागि झाले होते.