अवश्य वाचा


  • Share

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर

मुंबई: राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यासाठी कोळंबकर हे राजभवनात पोहोचले आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी विधानसभा सचिवांकडे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन ज्येष्ठ सदस्यांची नावं आली होती. त्यापैकी ज्येष्ठ सदस्य म्हणून कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात आल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं. उद्या विधानसभा सत्र सुरू झाल्यावर सर्व पक्षीय नवनिर्वाचित आमदारांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं. फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; ८० तासांत पायउतार कोळंबकर हे सलग आठवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते वडाळा विधानसभा मतदारसंघातून ते सात वेळा निवडून आले आहेत. कट्टर शिवसैनिक ते भाजपचे नेते अशी ओळख असलेले कोळंबकर सभागृहाचं कामकाज कसं चालवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? शिवसेना प्रमुख विरुद्ध माजी शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यावेळी माजी शिवसैनिक असलेले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोळंबकर हे उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करताना अडचणीत आणतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.