अवश्य वाचा


  • Share

ऑपरेशन लोटस अखेर फेल; ‘पवार’फुल्ल गेम

मुंबई (प्रतिनिधी) - सत्ता लालसेपोटी नितीमत्ता, नियम, कायदे धाब्यावर बसवून भारतीय जनता पक्षाने रात्रीच्या अंधारात राज्यावर राजकीय सर्जीकल स्ट्राईक केले आणि रात्रीतून राष्ट्रपती राजवट हटवून सत्ता स्थापन केली मात्र या देशात अजूनही कायद्याचे राज्य आहे. याची प्रचिती आज पुन्हा समस्त देशवासीयांना आली. विरोधी पक्षांच्या वतीने या रात्रीस खेळ चाले... या कार्यक्रमाविरुध्द न्यायालयात दाद मागितली गेली आणि न्यायालयाने आज फडणवीस सरकारला मोठा दणका देत 48 तासात बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. आणि हे बहूमत सिध्द करताना गुप्त मतदान न घेता उघड मतदान करण्याचे आदेश देत या सर्व प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश विधीमंडळाला दिले. त्यामुळे आकड्याचे गणीत जुळणार नाही, आमदार फोडण्यास वाव मिळणार नाही या भितीपोटी आज दुपारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला तर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. या राजकीय घटनेमुळे राज्यात पुन्हा मोठा राजकीय भुकंप झाला आणि पुन्हा एकदा राज्याला नवीन सरकार येण्याची वाट पहावी लागली. राज्यपालांनी आपली मनमानी करत पदाचा दुरुपयोग करत राष्ट्रपती राजवट हटवून फडणवीस सरकारला शपथ दिली. बहुमताची कोणतीही खात्री न करता सरकार स्थापन करुन दिले तसेच सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी तब्बल आठ दिवसाचा कालावधी दिला. या मनमानी विरुध्द शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी शनिवारीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयात रविवार आणि सोमवार दोन दिवस सुनावणी चालली आणि आज मंगळवारी निकाल देत सरकारला 48 तासांत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्याने भाजप भानावर आले आणि आकड्याचे गणित कोणत्याही परिस्थितीत जुळणार नसल्याने विधीमंडळात तमाशा व अपमान होण्यापेक्षा आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अल्पमताचे सरकार अखेर कोसळले. फडणवीस सरकार कोसळल्यानंतर राज्यपालांना आता महाआघाडीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण द्यावे लागणार आहे. त्यानुसार महाआघाडीकडून उद्याच मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात येणार असल्याचे समजते.