अवश्य वाचा


  • Share

रात्रीच्या अंधारात भाजपची यशस्वी खेळी ; राष्ट्रवादी काँग्रेस फोडून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री

पुरोगामी समाजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी राजकीय भुकंप झाला. फोडाफोडीच्या राजकारणात माहिर झालेल्या भाजपाने शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांवर तसेच जनतेवर सर्जीकल स्ट्राईक करत राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सरकार स्थापन केले. राज्यातील जनता गाढ झोपेत असतांना राज्यपालांशी संधान साधून रात्रीतून राष्ट्रपती राजवट हटवून राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेऊन मी पुन्हा येईन... पुन्हा येईन म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजितदादा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. या रात्रीच्या खेळीने राज्यासह देशात प्रचंड राजकीय खळबळ उडाली आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला गेला. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी पडद्याआड सुत्र हालवत अनेक खेळ्या केल्या आणि रात्री त्या यशस्वी केल्या. दरम्यान या घटनेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली असून अजितदादा पवार व त्यांच्या सहकारी आमदारांवर पक्ष प्रमुख शरद पवार शिस्त भंगाची कारवाई करणार असल्याने पुन्हा एकदा राज्यात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फडणवीसांना 30 नोव्हेंबरला आपले बहुमत सिध्द करायचे आहे. तोपर्यंत राज्यात बर्‍याच घडामोडी घडणार असून जनतेला उघड्या डोळ्याने पहावे लागणार आहे. मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यात काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. भाजप सेनेचा काडीमोड झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची महाआघाडी स्थापन झाली आणि सर्व राजकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर आज शनिवारी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार होता. मात्र त्या आधिच भाजपने सर्जिकल स्ट्राईक करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाआघाडी सत्तेचे स्वप्न पहात असतांनाच भाजपने आपली मोठी राजकीय खेळी केली. शुक्रवारी रात्री अजित पवारांशी संधान साधून राष्ट्रवादीचे काही आमदार फोडून रात्री साडेबारा वाजता राज्यपालांची भेट घेतली. आणि सत्तेचा दावा केला. राज्यपालांनीही तातडीने हा दावा मान्य करत रात्री 1 वाजता राष्ट्रपतींना राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस केली. आणि तिलाही राष्ट्रपतींनी तात्काळ मान्यता देत राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविली. पहाटे राजकीय गणिते जुळवित शपथ विधीची तयारी करण्यात आली आणि सकाळी आठ वाजता राज भवनाच्या एका छोट्याखाणी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींपासून अन्य राजकीय पक्ष तसेच प्रसारमाध्यमही अन्भिन्न राहिले. आणि जनतेला तर याचा मागमुसही नव्हता. सकाळी इलेक्ट्रॉनिक मिडीयाने हे ब्रेकींग न्युज दाखविल्यानंतर अनेकांना धक्के बसले. महाविकास अघाडीचे सरकार बनत असतांना हा राजकीय चमत्कार रात्रीतून कसा झाला यावरच आज दिवसभर विविध ठिकाणी चर्चेला उधाण आले आहे. राज्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच विचित्र राज्य घटना घडल्या.