अवश्य वाचा


  • Share

शहरात लवकरच उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे- थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चैन स्कॅचिंग च्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. तसेच तरुणाई धुम स्टाईलने गाड्या पळवुन अपघातांना निमंत्रण देत आहे. या पार्श्‍वभुमीवर शहरात महत्वाच्या ठिकाणी अतिषय उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांनी दिली. आगामी गणेश उत्सव व बकरी ईद च्या पार्श्‍वभुमीवर शहर पोलिस स्टेशन च्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये जातीय सलोखा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षपदावरुन डीवायएसपी अशोक थोरात बोलत होते. याप्रसंगी शहर पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे, नगरपालिकेच प्रशासकिय अधिकारी श्रीनिवास पगडाल, विजवितरण कंपनीचे श्री.जायभाये उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना अशोक थोरात म्हणाले की, संगमनेर शहराला जातीय दंगलीची मोठी पार्श्‍वभुमी आहे. मात्र 1995 नंतर संगमनेर शहरातील हिंदू व मुस्लिम समाजातील सुज्ञ लोकांनी एकत्र येवून शहरात जातीय सलोखा निर्माण केला व जातीय दंगलीचा डाग पुसुन टाकला. संगमनेरकरांना शहरात शांतता हवी आहे. मात्र काही उनाड व सळसळत्या रक्ताच्या तरुणांमुळे वातावरण खराब होते. या तरुणांना अटकाव करणे ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सदैव तत्पर आहे मात्र नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जातीय व धार्मीक तणाव वाढविण्याचे काम जाणीवपुर्वक काही माथेफिरुंकडून केले जाते. त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबद्द्ल बोलतांना थोरात म्हणाले की, शहरात चैन स्कॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडतात अशा महत्वाच्या ठिकाणी प्रशासन व लोकसहभागातून लवकरच उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या प्रकारांना आळा घातला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी शहर पो.नि. गोविंद ओमासे यांनीही नागरिकांनी कायद्याचे पालक करण्याचे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कुठे अनुचित प्रकार घडत असेल तर त्याची खबर त्वरीत पोलिसांना द्यावी जेणेकरुन कारवाई करणे व पुढील अनर्थ टाळणे सोपे होईल. याप्रसंगी पालिकेचे प्रशासकिय अधिकारी श्रीनिवास पगडाल यांनीही आगामी सण उत्सव दरम्यान पालिकेच्या तयारीचा आढावा घेत आपली भुमिका विशद केली. याप्रसंगी भाजपचे शिरीष मुळे, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, काँग्रेसचे शकील पेंटर, शिवजयंती उत्सव समितीचे नरेश माळवे यांनिही आपल्या भुमिका मांडत प्रशासनाला जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वोतापरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.