अवश्य वाचा


  • Share

थेट जनतेतून सरपंच निवडीचे ग्रामीण भागातून जोरदार स्वागत

संगमनेर (प्रतिनिधी) जनतेतून थेट सरपंच निवडीच्या निर्णयामध्ये विविध राजकीय पक्षांमध्ये मतभिन्नता असली तरी ग्रामीण भागामध्ये या निर्णयाचे जोरदार स्वागत होतांना दिसत आहे. येत्या फेबु्रवारी, मार्च 2018 पर्यंत तालुक्यातील 41 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत असुन यात सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने आत्तापासूनच या गावांमध्ये राजकीय वारे वाहु लागले आहे. नगराध्यक्षाप्रमाणे सरपंचाचीही निवडणूक थेट जनतेतून करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तसेच 1995 नंतर जन्मलेल्यांसाठी 7 वी पास शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. तर या लोकनियुक्त सरपंचांना जादा अधिकारही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरपंच पदाला आता पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. कारण सरपंच एका पक्षाचा बहुमत दुसर्‍या पक्षाचे असे होत असल्याने त्याचा विकासावर परिणाम होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र सर्वसामान्य जनतेतुन या निर्णयाचे स्वागत होतांना दिसत आहे. कारण आता सरपंच पदासाठी लॉबीन करणे किंवा मतांची खरेदी विक्री करणे, वरीष्ठांची मर्जी संपादन करणे गरजेचे राहणार नाही. तसेच सरपंच पदासाठी होणारा घोडेबाजार थांबणार आहे. अनेक लायक उमेदवारांना पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांकडून उमेदवारी मिळत नाही. त्यामुळे पात्र उमेदवार ग्रामपंचायतीमध्ये जात नाही. या निर्णयामुळे मात्र पात्र व लायक उमेदवाराला पक्षाने तिकीट दिले नाही तरी अपक्ष म्हणून उभे राहता येणार आहे व जनतेच्या मतावर थेट सरपंच होता येणार आहे. हा निर्णय काही राजकीय पक्षांच्या फायद्याचा व काहींच्या तोट्याचा असला तरी अनेक ग्रामपंचायतीमध्ये चांगले उमेदवार सरपंच म्हणुन निवडून जाणार असुन गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे अनेक इच्छुकांनी आत्तापासुन सरपंच पदाच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. फेबु्रवारी, मार्च मध्ये होणार्‍या अनेक ग्रामपंचातीमध्ये थेट लोकनियुक्त सरपंच निवडून येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.