अवश्य वाचा


  • Share

अकोले तालुक्यातील बलठण, कोथळे, शिरपुंजे, यासह अनेक धरणे ओव्हर फ्लो

अकोले (प्रतिनिधी) संततधार पावसामुळे मुळा खोर्‍यात असलेले बलठण, कोथळे, शिरपुंजे आणि जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असलेला येसरठाव हे प्रकल्प आज ओव्हर फ्लो झाले. तालुक्यातील वाकी, आंबित, पिंपळगाव खांड हे प्रकल्प यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत. मुळा नदीच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहत आहे. बलठण (क्षमता 202 दशलक्ष घनफूट), कोथळे (क्षमता 182 दशलक्ष घनफुट), शिरपुंजे (155 दशलक्ष घनफूट) आणि येसरठाव (263 दशलक्ष घनफूट) हे प्रकल्प आज तुडुंब भरले. पावसाचा जोर कायम असल्याने आत मुळा नदीच्या प्रवाहातही वाढ झाली असून, मुळा धरणात पाण्याची आवक वेगाने होत आहे. तालुक्याच्या दक्षिण भागात पुष्पावंती नदीवर येसरठाव प्रकल्प आहे. त्याच्या वरच्या बाजूलाच याच नदीवर पळसुंदे धरणाचे सत्तर टक्के बांधकाम झाले आहे. त्यातही पाणी साठले आहे. येसरठाव वर मोरवाडी, खेतेवाडी, केळी, कोतूळ, येसरठाव, उंबरवाडी, सातेवाडी, नागमाळ या गावांमधील सुमारे 900 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. फोफसंडीजवळ कांबड किल्ल्यावर उगम पावलेली मांडवी नदीही वाहती झाली. पुष्पावंती व मांडवी नदीचे पाणी पुढे एकत्र येऊन चिलेवाउी या जुन्नर तालुक्यातील धरणात जात आहे. त्यामुळे एक हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणातही पाण्याची आवक वेगाने होत आहे.