अवश्य वाचा


  • Share

भंडारदरा पाणलोटात दमदार पाऊस धराणात 27 टक्के पाणीसाठा, मुळाही वाहु लागली

भंडारदरा(प्रतिनिधी) उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर आणि रतनवाडित आद्रा नक्षत्राच्या सरींचे तांडवनृत्य सुरु असल्याने गत बारा तासांत धरणात विक्रमी 589 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने सायंकाळी पाणीसाठा 3080 दशलक्ष घनफूट (27 टक्के) झाला होता. शुक्रवारी रात्रीही जोरदार पाऊस सुरु असल्याने आजही धरणात विक्रमी पाण्याची आवक होणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आज 32-35 टक्के होणार आहे. 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव दुपारी 4 वाजता ओव्हरफ्लो झाला असून कृष्णवंती नदी प्रवाहित झाल्याने निळवंडे धरणातही प्रथमच आवक सुरु झाली आहे. मुळा पाणलोटातही मुसळधार पाऊस सुरु झाल्याने आंबित, पिंपळगाव खांडनंतर बलठाण धरणातही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दोन दिवसांत हे धरण भरण्याची शक्यता आहे. काल सकाळी संपलेल्या बारा तासांत भंडारदरा धरणात तब्बल 59 दलघफू पाणी नव्योने जमा झाले. त्यात 35 दलघफू पाण्याचा वापर झाला तर अन्य पाणी धरणात जमा झाले. या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. घाटघर आणि रतनवाडीत आर्द्रा सरींचे तांडव सुरु असल्याने डोंगरावरुन वाहणारे धबधबे आक्राळविक्राळ रुप धारण करीत असून ओढे नाल्यांना पूर आला असून हे पाणी धरणात विसावत असल्याने धरणाचे पोट फुगू लागले आहे. भात खाचरांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान मुळा पाणलोटातही पावसाचा जोर कायम असून हरिश्‍चंद्र गड, कळसूबाईचे शिखर, आंबित, पाचनई, कोथडे या परिसरात जोरदार पाऊस सुुरु असल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. कोतूळ येथून 692 क्युसेकने मुळा धरणाकडे झेपावत असून धरणात प्रथमच या भागातील पाण्याची आवक रात्री सुरु झाली होती. यापूर्वी झालेली आवक पारनेरमध्ये झालेल्या पावसाची होती. धरणात सध्या 4904 दलघफू पाणीसाठा आहे. भंडारदरा मुळा पाणलोटात दमदार पाऊस सुरू असुन या पावसामुळे परिसरातील सर्वच नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. हे पाणी धरणाच्या पोटात झपाट्याने शिरत असुन धरणाचा पाणीसाठा वाढत आहे. दमदार पावसाने परिसरातील भात शेतीला वेग आला असुन नाशिक, मुंबई, पुणे, नगर जिल्ह्यातील पर्यटकांचे पाय या पर्यटन केंद्राकडे वळू लागले आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास भंडारदरा लवकरच 50 टक्के भरण्याची शक्यता आहे.