अवश्य वाचा


  • Share

अमृतवाहिनी अभियांत्रिकीची “उन्नत महाराष्ट्र अभियान” अंतर्गत मध्यवर्ती केंद्रासाठी निवड

संगमनेर (प्रतिनिधी) देशातील ग्रामीण भागाच्या विकास कामामध्ये व सामाजिक क्षेत्रातील विकासांच्या समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियाना अंतर्गत मध्यवर्ती केंद्र म्हणून अमृतवाहिनी आभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश यांनी दिली़ या उपक्रमात संपूर्ण रायातून 12 महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातून फक्त अमृतवाहिनीची निवड करण्यात आली आहे़ प्रगत शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने परिवर्तन घडविण्यासाठी या अभियान अंतर्गत निवडक अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधन व कुशल मनुष्यबळाचा वापर यासाठी करण्यात येणार आहे़ या अभियानात निवड करण्यात येणार्‍या संस्थांमध्ये असलेली अभ्यासक्रमांची गुणवत्ता, विकास प्रकल्प व संशोधन करण्याची क्षमता व अनुभव, विविध शाखांमध्ये तज्ञ अध्यापकवर्ग व संशोधक, प्रयोगशाळा व इतर सुविधा, महाविद्यालयाची मानांकने इत्यादी असणे आवश्यक असते़ डॉ़ मिलिंद सोहोनी यांच्या मार्गदर्शनाखाली आय.आय.टी. मुंबईच्या पथकाने महाविद्यालयास भेट देऊन वरील सर्व बाबींची सविस्तर पाहणी करुन उन्नत महाराष्ट्र अभियान सल्लागार समितीने अमृतवाहिनी अभियांत्रिकीची मध्यवर्ती केंद्रासाठी निवड केली आहे. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने ग्रामीण विकासाच्या दृष्टीने किफायतशिर व नवीन तंत्रज्ञान वापरुन फिरते व सहज उभारणी करता येणारे डिटॅचेबल टॉयलेट, फेरोसिमेंट वॉटर टँक, कोकोनट सेल व बांबु यांचा घरबांधणीत उपयोग, चेक डॅम, इंधन बचतीसाठी अमृत चुल व बंब, वितरण व्यवस्थेसाठी विविध अ‍ॅप व सुविधा, डिजीटल इंडिया व स्किल इंडिया या मोहिमेत सहभाग, उर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारीत हायब्रीड प्रोजेक्टस्, जलसंधारण व मातीपरिक्षण, हरितगृह, विविध शेती औजारे इ़ क्षेत्रात भरीव कामगीरी व संशोधन केले आहे़ या सर्व क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन महाविद्यालयाची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे़ उन्नत महाराष्ट्र अभियाना अंतर्गत महाविद्यालयामध्ये तंत्रज्ञान व विकास कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे जलसंधारण, इंधन, ऊर्जा, दुष्काळ निवारण, रस्ते विकास, घर बांधणी व नियोजन, घन कचरा व जलनिस्सारण व्यवस्था, स्मार्ट व्हिलेज, भौगोलिक माहिती व्यवस्थापन, लघु उद्योग व ग्राम उद्योग इत्यादी ग्रामीण व निमशहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान विकास, मार्गदर्शन व सनियंत्रण उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रकल्पाचे समन्वयक व यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ़ विष्णू वाकचौरे यांनी सांगितले़ जिल्हा, तालुका व नगरपरिषद नियोजन समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून ही कामे करण्यात येणार आहेत़ आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ़ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी महाविद्यालयाने गेली 35वर्षे सातत्यपूर्ण दर्जेदार व मुल्यवर्धित तांत्रिक शिक्षणाबरोबरच ग्रामीण विकासासाठी आपले योगदान दिले आहे़ नाविन्यपूर्ण संशोधन व गुणवत्तेचा ध्यास घेऊन केलेल्या कामाचा आय. आय. टी. मुंबई व उन्नत महाराष्ट्र अभियान सल्लागार समितीने दखल घेतल्याचे प्रतिपादन संस्थेचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे यांनी केले़ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ़ सुधीर तांबे, विश्‍वस्त सौ़ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अनिल शिंदे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा़ ए़ के.मिश्रा, प्रकल्पाचे समन्वयक व यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ़ विष्णू वाकचौरे, रजिस्ट्रार प्रा़ विजय वाघे, सर्व विभाग प्रमुख व संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले़