अवश्य वाचा


  • Share

परिश्रम चांगले तर यश हमखास - आहिरे

संगमनेर (प्रतिनिधी) कठोर परिश्रम, अभ्यासातले सातत्य, अभ्यासक्रमाची समज आणि आपल्या क्षमता व मनाचा कल योग्य दिशेने असला तर राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होणे मुळीच कठीण नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यसेवा परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले भुषण अहिरे यांनी केले. माणुसकी सामाजिक संस्था व आधार फौंडेशन संगमनेर आयोजित एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंताच्या सत्कार समारंभात ते बोलत हेाते. अहिरे पुढे म्हणाले की, मुख्य परीक्षेच्या अगोदरची प्रीलिअम परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. याकडे अभ्यास करणार्‍यांनी विशेष लक्ष द्यावे. प्रामाणिकपणे वेळ देऊन अभ्यास करतांनाच आपल्या अभ्यासाची दिशाही योग्य असली पाहिजे, असे सांगून उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले. माणुसकी व आधार संस्थाद्वारे अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भुषण अहिरे, अमोल उगलमुगले (संगमनेर), महेश हांडे (संगमनेर), राहुल झाल्टे (अकोले) या स्पर्धा परिक्षांतील यशवंताचा सत्कार करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी पालवे यांनी जिल्हा परिषद शाळेपासूनचा आपला प्रवास सांगून सामान्य घरातील मुलेही अधिकारी होऊ शकतात हे पटवून दिले व संगमनेरच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. अकोल्याचे राहुल झाल्टे यावेळी बोलतांना म्हणाले की, स्पर्धा परिक्षांसाठी अभ्यासाच्या नियोजनातील अपयश म्हणजेच अपयशाचे नियोजन असते. योग्य नियोजनाशिवाय स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणे चुकिचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रतिकुल परिस्थितीतुन शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा गाजविणारे संगमनेरचे महेश हांडे यांनी उपस्थितांच्या सर्व शंकांचे निरसन करुन परिक्षेनंतरच्या मुलाखतीतले अनुभव सांगतांना आपल्या कवितेद्वारे प्रेरणादायी सादरीकरण केले. कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेल्या अमोल उगलमुगलेू यांनी तर ग्रामीण भागातील मुलांना एस.टी. बसचे उदाहरण देऊन स्पर्धा परिक्षा म्हणजे काय याचा मुलमंत्र सांगून उपस्थितांची मने जिंकली. सलग तिसर्‍यांदा यूपीएसीत उत्तीर्ण होणारे प्रवीण डोंगरे यांचा सत्कार त्यांच्या मातोश्रींनी स्विकारला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माणुसकी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी भुषविले व आपल्या वाणिज्य शाखेतील पुण्यातील दैदीप्यमान यशप्रवास उलगडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणुसकी व आधारचे सदस्य गणेश बोर्‍हाडे, अमित पवार, ज्ञानेश्‍वर केदार, सुखदेव इल्हे, नवनाथ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर आभार संदीप घोलप यांनी मानले.