अवश्य वाचा


  • Share

यंदाचा खरीप पुन्हा संकटात - पेरणी वाया जाणार? वरूण राजा रूसला - पावसाने खंड दिल्याने शेतकरी चिंतातूर

तळेगांव दिघे ( प्रतिनिधी) मोसमी पावसाच्या आगमनाला यंदा जून महिना संपत आला तरी कमालीचा विलंब होत आहे, हे पाहून तहानलेला संपूर्ण ग्रामिण महाराष्ट्र कमालीचा चिंतातूर बनला होता; जुलै महिन्याच्या तोंडावर ग्रामिण भागातील बहुसंख्य भागातील शेतकरी पेरणीची व मशागतीची कामे आटपून घेत असतो. मात्र पावसाने आता ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट तर उभे राहणार नाही ना या धास्तीने बळीराजा धास्तवला आहे. सोयाबिन हमखास नफा देणारं पिक म्हणुन हजारो हेक्टरवर ग्रामिण भागात पेरणी केली जाते. पावसाळी वातावरणात ढग येतात व जातात मात्र पाऊस काही पडत नाही. सततच्या दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणार तळेगांव पट्टयात शेतकर्‍यांनी शेतात पेरणी करून डोळे पावसाकडे लावले आहे. भंडारदरा धरणक्षेत्राच्या परिसरामध्ये पाऊस पडत असला तरी तो पठार व इतर भागावर कधी पडेल यांची चिंता बळीराजाला लागली आहे. देशाच्या वेधशाळांच्या निरीक्षण क्षेत्रामध्येही पावसाची गैरहजेरी खरोखरच चिंताग्रस्त आहे. पावसाचा लहरीपणा अनेक वर्षांपासून अधुनमधून शेतक-यांनी अनुभवला आहे. यंदा आंदोलनानंतर पुन्हा शेतात उभा राहिलेल्या बळीराजाला यंदाचा हंगामात पिकाच्या माध्यमातून हातात पैसा हवा आहे पाऊस वेळेवर पडला तर शेतातून अंकुर फुटेल व शेत हिरवेगार होईल या आशेवर बी-बियानांसाठी धावपळ करून शेतात नागरणी करून पेरणी केली. सोयाबिन व बाजरी व खरीपातील पिके घेण्यासाठी त्याची धावपाळ झाली. जून संपला मात्र पाऊस काही येत नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर झालेले आंदोलन व राजकीय इच्छाशक्ती... शेतकर्‍यांसाठी कर्ज माफीची घोषणा शेतकर्‍यांना यंदाच्या हंगामात किती बळ देते हा काळच ठरवणार आहे. मात्र पावसाच्या आगमनास झालेला गंभीर प्रश्‍न निर्माण करू शकतो. मागील वर्षापासून पाऊस वेळेवर पडत नाही , पडला तर तो ही लहरीपणाने त्यामुळे पाण्याबरोबरच चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अल्पभूधारक, मध्यम शेती असलेल्या शेतकर्‍यांना, पशुपालकांसमोर जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्‍न उभा आहे. तालुकाबाहेर जाऊन चार्‍याचा शोध घ्यावा तरते हजार रुपयाला शेकडा कडबा असा अभूतपूर्व भाव द्यावा लागतो. गोठयतील खुंटयला असलेल्या जनावरास वर्षभर पुरेल इतका चारा साठवून ठेवला होता मात्र आता तोही संपत आल्याने चारा विकत घेतो म्हटले तरी चारा मिळेनासा झाला आहे. अशी स्थिती तळेगांव पंचक्रोशीत दिसून येत आहे. आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर पशुधनाला वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागणार आहे. भीषण दुष्काळाचे सावट दारात उभे राहते आहे, थोड्याश्या पावसाने उजाड माळरान हिरवे झाले मात्र तेही कोमेजून पडले त्यामुळे पाऊस वेळेवर पडण्यासाठी शेतकरी विठ्ठलाचा धावा करीत आहे. पावसाने ओढ दिल्याने पुढे काय करावे या चिंतेत शेतकरी पडल्याने दुबार पेरणी झाल्यास पैसा कसा उभारावा या प्रश्‍नांनी काळीज चिर्रर्र होतांना दिसत आहे.