अवश्य वाचा


  • Share

पर्यटकांना खुणावतोय भंडारदर्‍याचा समृध्द परिसर

भंडारदरा (प्रतिनिधी) पावसाळा सुरु झाला की उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जीवाला सुखद दिलासा मिळतो. जुन मध्ये शाळा उघडलेल्या असल्या तरी घराघरातून वर्षा सहलींचा सुर उमटतो. मग छोटीशीच का होईना पण निसर्गरम्य वातावरणात, डोंगरदर्‍यांच्या कुशीत अवघळ धबधबा पाहण्यासाठी जीव ओढ घेतो. पावसाळ्यात निसर्गाचा चौफेर अविष्कार पहायला मिळाणार आणि पर्यटकांना मोह पाडणारं ठिकाण म्हणजे भंडारदरा. पाऊस सुरु होण्याअगोदर येथील परिसरात रंगली होती काजव्यांची मयसभा. जंगलातील विविध झाडे काजव्यांच्या लखलखाटामुळे उजळुन निघाली होती. हा दिपोत्सव नजरेत साठवुन घेतो न तोच हिरव्या रंगाच्या अनेक छटांचा मनोहर संगम भंडारदरा परिसरात सुरु होतो. पावसाळ्याच्या प्रारंभी तर येथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम असते. वातावरणातील सुखद गारवा मध्येच कोसळणार्‍या पावसाच्या सरी आणि जलपृपात अवघेच भुरळ पाडणारे. कळसुबाई चा डोंगर पर्यटकांना साद देतो. घाटघर, साम्रद, रतनवाडी येथील सौंदर्याला हि बहर येतो. भंडारदरा चे खास आकर्षण म्हणजे रंधा फॉल उंचीवरुन कोसळणारे हे पाणी वाहून नजरेचे पारणे फिटते. येथे आलेल्या पर्यटकांचा पाय लवकर निघत नाही एवढी मोहिनी या निसर्ग समृध्द परिसराची असते. घाटघर येथील कोकणकडा सर्वांना खुणावतो. तर आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची सांदनदरी तर निसर्गाचा अद्भूत चमत्कार मानली गेली आहे. रतनावाडीचे प्राचिन हेमाडपंथी अमृतेश्‍वराचा पावन परिसर पर्यटकांबरोबर भाविकांना देखील नतमस्तक करतो. असा हा अनुभव एकदा नव्हे तर वारंवार घेतला तरी मनाची तृप्ती होत नाही हेच खरे.