अवश्य वाचा


  • Share

जंगलातील हिंस्त्र पशु बिबट्या भक्क्षाच्या शोधात नागरी वस्तीत

संगमनेर (प्रतिनिधी) माणसाची हाव व त्यानुसार गरजा वाढत गेल्याने माणसाने जंगलांमध्ये प्रचंड प्रमाणात अतिक्रमण केले त्यामुळे तेथील हिंस्त्र पशु, पक्षी, जंगली जनावरे यांचे भवितव्य संकटात सापडले. आता जंगलातील सर्वाधिक हिंस्त्र पशु असणार्‍या बिबट्यांनी जंगल सोडून भक्क्षांच्या शोधासाठी मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. ग्रामीण वाड्या वस्त्यांवर शेतात येऊन तो पाळीव प्राणी व माणसालाही आपले भक्क्ष बनवित आहे. आता तेथेही शिकार मिळत नसल्याने बिबट्याने शहराकडे आपला मोर्चा वळविला आहे. संगमनेर शहरातील रहेमतनगर, एकता नगर परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याने दर्शन दिल्याने येथील रहिवाशी भयभीत झाले आहे. बिबट्यांच्या भितीने येथील नागरीक धास्तावले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. तालुक्यातील समनापूर, कोल्हेवाडी, कनोली, निमगाव पागा, आंबीखालसा आदी गावांमध्ये व वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. तर आता बिबटे मानवी वस्त्यांमध्येही घुसू लागले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील रहेमतनगर, एकता नगर, उम्मत नगर, जमजम कॉलनी, घोडेकर मळा, फादरवाडी, मेहेत्रे मळा, प्रवरा नदी परिसरातील नागरीकांना बिबट्या दिवसाढवळ्या दिसत आहे. एका जणाच्या घरातही बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केला पण त्याच दरम्यान महिलेने आरडाओरड केला त्यामुळे आजूबाजूच्या नागरीकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. या घटनेनंतर परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरीकांवर रात्रीभर जागे राहण्याची वेळ आली आहे. तरी वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शाविद शेख, जानूभाई शेख, निसार शेख, रसिद शेख आदी नागरीकांनी केली आहे.