अवश्य वाचा


  • Share

राजहंस दुध संघाचे टँकर वाड्यावस्त्यांना ठरले वरदान

संगमनेर (प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यातील या गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई भासत आहे.त्या ठिकाणी राज्याचे मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दुध संघाचे पाण्याचे टँकर पोहचत आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने दुध संघाचे टँकर अनेक गावांना व वाड्यावस्त्यांना वरदान ठरत आहेत. त्याचबरोबर दररोज किती गावांना व वाड्यावस्त्यांना टँकर पोहच झाले याबाबतही आमदार थोरात दररोज पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत. संगमनेर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाळ्याात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असतो. त्यामुळे ओढे,नाले,सिमेंट बंधारे,पाझर तलाव भरतात तर कधी भरत ही नाहीत. पण उन्हाळ्याामध्ये पुर्णपणे कोरडे ठाक पडतात. मग महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.आमदार थोरात यांनी पंचायत समितीच्या हॉलमध्ये आढावा बैठक घेवून प्रांतधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना केल्या होत्या. तरीही अनेक गावे व वाड्या वस्त्यांना टँकर सुरु झाले नव्हते. त्यामुळे सर्वसामान्या नागरिकांचे पाण्यावाचून हाल होवू नयेत म्हणून आमदार थोरात व दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका दुध संघाचे टँकर सुरु करण्यात आले आहेत. तसेच आमदार थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात टँकर सुरु करण्यासंदर्भात नागरिक येत असून या गावांना व वाड्या वस्त्यांना टँकर पाहिजे त्यांना दुध संघाचे टँकर देण्यात येत आहेत. त्यामुळे पिण्याचा व जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागत आहे. शासनाचा टँकर सुरु होईपर्यंत नागरिकांना दुध संघाच्या टँकरचा आधार मिळत आहे. कोणत्या गावांना व वाड्या वस्त्यांना दररोज किती टँकर पोहच झाले याचा आमदार थोरात हे दररोज पाठपुरावा करत असतात. उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर राहणार्‍या नागरिकांना टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व संचालक मंडळाने घेतला आहे.