अवश्य वाचा


  • Share

अतीक्रमण हटाव मोहिमेमुळे विस्तापीत झालेल्यांचे पुनर्वसन करा

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर पालिकेने शहरात राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक टपरीधारक, हातगाडीधारक, व रस्त्याच्या कडेला छोटा मोठा व्यवसाय करुन आपली उपजिवीका करणारे शेकडो छोटे मोठे व्यापारी आता बेरोजगार झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालीका प्रशासनाने या बेरोजगारांचा व त्यांच्या कुटुंबाचा विचार करुन विस्थापित झालेल्यांचे पूनर्वसन करावे अशी मागणी काल टपरीधारक संघटनांनी मोर्चा काढून प्रशासनाकडे केली. संगमनेेर पालीकेने अतिक्रमण धारकांना कोणतीही सुचना न देता त्यांचे दुकाने, टपर्‍या, हातगाड्या तोडल्या व त्यांची रोजी रोटी बंद केली. हे अतिक्रमण हटवितांना या टपरीधारकांचे म्हणणे ऐकुन घेण्यात आले नाही. नैसर्गिक न्यायतत्वाने विचार केला नाही. तसेच कारवाईतही मोठा भेदभाव करण्यात आला. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. या बेरोजगार झालेल्यांवरील अन्याय दुर करावा यासाठी आता पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा यासाठी टपरीधारक संघटनेच्या वतीने काल मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या असुन त्यात शहरातील टपरीधारकांची गणना करण्यात यावी व त्यांच्यावर अचानक अशी कारवाई करु नये, शहराचा रोडमॅप तयार करावा या रोडमॅपमध्ये कच्ची व पक्की अतिक्रमे असतील त्यांचे मोजमापे करून त्यांचे रेकॉर्ड करावे. जे अतिक्रमणे रस्त्याला व वाहतूकीला अडथळा ठरत नाही अशा अतिक्रमणाला कायम स्वरूपी व्यवसायाला परवाना द्यावा व जे अतिक्रमण वाहतूकीला अडथळा ठरत असले अशा अतिक्रमणाचे पुनवर्सन करावे. अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यापूर्वी संघटननेला 30 दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी व त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व त्यांच्या म्हणण्याच्या संतोल न्यायाने अतिक्रमण हटाव कारवाईत ज्यांचे आर्थिक नुकसान त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. पालिकेने रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या गाळ्यांना पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. महत्वाच्या रस्त्यावर अनेक मोठ मोठी खाजगी व्यापारी संकुले बांधण्यात आली परंतू त्यांना पार्किंग नाही अशा व्यापारी संकुलांना पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात यावे या सह अनेक मागण्या या निवेदनात देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. संग्राम जोंधळे, अब्दुला चौधरी, शकिलभाई पेंटर, हबीब शेख, शिवपाल ठाकूर, भारत पडवळ, संजय रहाणे, अकिल खान, नजीर खान, अमीनभाई तांबोळी, गिरीष सोमानी यांच्या सह अनेक छोटे-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.