अवश्य वाचा


  • Share

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय 48) यांचे आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. त्याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मुंढवातील भिमनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून आज सांयकाळी 5 वाजता निघणार आहे. कोरेगाव पार्क येथील स्मशानभुमीत अंत्यविधी होणार आहे. मुळचे रिपाइंचे असलेले कांबळे हे नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून विजयी झाले होते. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली होती. ते रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव हे त्यांच मुळ गाव आहे. 1972 च्या दुष्काळात पुणे येथील विश्रांतवाडी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती. 1977 पासून दलित पँथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. 1980 मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. या आंदोलनात त्यांना कारावासही भोगला होता. 1983 ते 1985 या कालावधीत ते दलित पँथरचे शहराध्यक्ष होते. 1990 ते 1996 या काळात रिपाइंचे शहराध्यक्ष बनले होते. 1997 मध्ये पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. 2002 मध्ये ते दुसर्‍यांदा नगरसेवक बनले. 2005 ते 2009 या कालावधीत त्यांनी रिपाइंचे पश्र्चिम महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 2017 मध्ये तिसर्‍यांदा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. 15 मार्च रोजी 2017 रोजी त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली होती.