अवश्य वाचा


  • Share

बिबट्याच्या हल्ल्यात सभापती पर्बतराव नाईकवाडी गंभीर जखमी

अकोले (प्रतिनिधी) अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पर्बतराव नाईकवाडी यांच्यावर आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास बिबट्याने जोराचा हल्ला केला. या हल्ल्यात सभापती पर्बत नाईकवाडी गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर नाशिक येथील सुयश हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु आहे. हि घटना तालुक्यातील गर्दणी येथे घडली. या बाबत माहिती अशी की, तालुक्यातील गर्दणी येथील रहिवाशी व अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पर्बतराव नाईकवाडी हे पहाटे आपल्या शेतात पाणी भरत असतांना अचानक पाठीमागून बिबट्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर नाईकवाडी यांनी या बिबट्याचा जोरदार प्रतिकार करत आरडा ओरडा केला. त्यामुळे आजुबाजुचे नागरिक मदतीला धावल्याने बिबट्याने तेथुन धुम ठोकली. दरम्यान बिबट्याच्या या हल्ल्यात नाईकवाडी यांच्या हाताला, पाठीला तसेच डोक्यालाही गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी शहरातील डॉ.भांडकोळी यांच्या हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक येथील सुयश हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान हि घटना समजताच त्यांच्या हितचिंतकांनी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. नाईकवाडी यांच्यावरील हल्ल्याची माहिती समजताच वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याचा शोध घेतला मात्र बिबट्या पसार होण्यात यशस्वी झाला. या परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.