अवश्य वाचा


  • Share

पिंपळगावदेपामधील अवैध दारु विक्री बंद करा

संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पठारभागातील पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे. राजकीय व पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तामुळे सुरु झालेल्या या दारु विक्री मुळे अनेकांचे संसार धोक्यात आले असुन गावचे गावच हरवत चालले आहे. गावातील युवापीढीही या दारुच्या आहारी जात असुन त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले आहे. गावात सुरु असणारी हि अवैध दारु विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी पिंपळगाव देपा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रामदास ढेरंगे व ग्रामस्थांनी केली आहे. या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. गावातील शाळा, मंदीरे व महत्वाच्या रस्त्यालगतच खुलेआम दारु विक्री केली जाते. या दारु विक्रीला कोणतीही परवानगरी नसतांना केवळ राजकीय वरदहस्ताने व पोलीसांशी आर्थिक लागेबांधे असल्याने हि दारु विक्री होत आहे. या दारुमुळे गावातील व परिसरातील युवापिढी व्यसनाधीन होत असुन त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या दारुमुळे गावात नेहमीच वादविवाद, हाणामार्‍या होत असुन महिलांना मोठ्या प्रमाणावर मानसिक व शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दारुविक्री बंद व्हावी म्हणून ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे. तरी प्रशासनाने या बाबत तात्काळ योग्य ती कारवाई करावी व हि दारु विक्री बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तालुक्यातील बहुंताशी दारू दुकाने बंद झाली. मात्र पिंपळगावदेपा येथे अवैधरित्या दारू विक्री सरू आहे. प्रशासनाने या अवैध दारू विक्रि तात्काळ बंद करावी अन्यथा ग्रामस्थांनी अंदोलनाचा इशारा दिला आगहे.