अवश्य वाचा


  • Share

मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा एक रूपायात 51 सर्वधर्मीय जोडपी होणार विवाहबद्ध

संगमनेर(प्रतिनिधी) आज रविवार दि. 14 मे रोजी रविवारी सायंकाळी चार वाजता मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे सर्वधर्मीय भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला दोन दशकांची परंपरा आहे. आजवर असंख्य दाम्पत्यांचे विवाह या सोहळ्यात संपन्न झाले असून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून समूह वर्षनुवर्षे हा उपक्रम राबवीत आहे. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणारे विवाह राज्यात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहेत. यंदाही या सोहळ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला असून या सोहळ्यात 44 हिंदू विवाह, 1 मुस्लीम विवाह, आणि 6 बौद्ध विवाह अशा सर्वधर्मीय 51 वधू वरांचे विवाह त्या त्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येणार आहेत. अशा प्रकारे 51 जोडपी आपल्या सहजीवनाची सुरुवात विशाल जनसमुदायाच्या साक्षीने करणार आहेत. उद्योग समूहाच्या संचालकांना वीस वर्षांपूर्वी ही संकल्पना सुचली. विवाह समारंभांवर होणारी उधळपट्टी त्यामुळे मुलीच्या परिवारांवर होणारा कर्जाचा बोजा या सर्व बाबी लक्षात घेऊन या सोहळ्याची आखणी करण्यात आली. पहिल्या वर्षापासून आजवर प्रत्येक वर्षी या सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. एकंदरीत समाजाने ही संकल्पना चांगलीच उचलून धरली आहे असे गेल्या अठरा वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे. या सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संगमनेरचे वैशिष्ट्य म्हणून हा मालपाणी पटर्न अनेक परिवारांना हवाहवासा वाटू लागला आहे. त्यापाठीमागे या सोहळ्याच्या आयोजनातील नीटनेटकेपणा हे आहे. या सोहळ्यासाठी कोणत्याही जाती धर्माचे बंधन नाही. कायद्याने सज्ञान असलेले वधू वर आपली नावे यामध्ये नोंदवू शकतात. हिंदू, मुस्लीम, बौद्ध,ख्रिश्चन अशा सर्वधर्मीय वधू वरांचे विवाह त्या त्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येतात. सजविलेला सुसज्ज मंडप, वधूवर निवास व्यवस्था, भोजन सुविधा, सवाद्य मिरवणूक, हार-तुरे, आहेर म्हणून द्यावयाच्या वस्तू, वधू वरांचे खास विवाहासाठी बनविण्यात आलेले पोषाख, मुंडावळ्या, अक्षता, पुरोहित वृन्दाकडून मंत्रोच्चार तसेच मंगलाष्टके आणि विवाहानंतर अग्नीच्या साक्षीने होणारी सप्तपदी यानुसार हिंदू विवाह संपन्न होतात. तर बौध्द, मुस्लीम, ख्रिश्चन यांचे विवाह त्यांच्या धर्मगरूंच्या उपस्थितीत धार्मिक रीतीरीवाजानुसार पार पडतात. वधू-वरांकाडील प्रत्येकी शंभर वर्‍हाडींच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. प्रत्येक दाम्पत्यास मालपाणी समूहाच्या वतीने आहेर म्हणून स्टील कपाट, भांडी, रॅक, असे संसारोपयोगी साहित्य देण्यात येते. सुमारे पंधरा ते वीस हजारांचा जनसमुदाय या कार्यक्रमाचा साक्षीदार असतो. मंत्रीगण, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते असे समाजाच्या सर्व थरातील माणसे उपस्थित असतात. स्वागत कक्ष, चौकशी, निवास व्यवस्था, स्टेजव्यवस्था, सजावट, भोजन, वाढपे, वीज व्यवस्था, पाणी व्यवस्था, स्वच्छता, भेटवस्तू, अन्य धर्मीय विवाह, मिरवणूक, सुरक्षा, फोटो प्रसिद्धी, बैठक, सत्कार समिती, अशा सुमारे पंचवीस समित्या कार्यरत असतात. उद्योग समुहातील कर्मचारी आणि कामगार प्रतिनिधी मिळून या नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात. सकाळी 10 वाजता वर्‍हाडी मंडळींच्या आगमनाने सुरु होणारा हा सोहळा सायंकाळी पाच वाजता नववधूंना सासरी जाण्यास निरोप देऊन संपन्न होतो. उद्योग समूहाचे सर्व संचालक हा सोहळा यशस्वी करण्यास जातीने लक्ष घालतात. सामाजिक ऋण फेडण्यासाठी हा उपक्रम गेली वीस वर्षे अव्याहत सुरु आहे.