अवश्य वाचा


  • Share

जीवनात योग स्वीकारल्यास मधुमेहावर सहज नियंत्रण- डॉ. राठी

संगमनेर (प्रतिनिधी) योग हीच जीवनशैली स्वीकारल्यास मधुमेहावर सहजतेने नियंत्रण मिळविता येते हे प्रयोगातून सिध्द झाले आहे’ असे प्रतिपादन संशोधिका आणि मधुमेह नियंत्रित भारत अभियानाच्या महाराष्ट्र व गोवा राज्याच्या समन्वयक डॉ. सुनंदा राठी यांनी आज येथे केले. केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय प्रणित मधुमेह नियंत्रित भारत अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संगमनेरमध्ये शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या सहकार्याने मालपाणी लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सोपे नियम पाळण्याचे मधुमेहाला टाळण्याचे या विषयावर व्याख्यान देताना डॉ. राठी यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर बंगलोर येथील एस.व्यासा विद्यापीठाचे उपाध्यक्ष व योगप्रचारक रामकुमार राठी, अभियानाची नगर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे डॉ. संजय मालपाणी, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के के देशमुख, श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख डॉ.ललितबिहारी जोशी, मालपाणी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जितेश चुडीवाल आदी उपस्थित होते. डॉ. राठी यांनी आपल्या भाषणातून मधुमेहींशी संवाद साधला. मधुमेह झाला म्हणून घाबरून न जाता बंगलोर येथील एस.व्यासा विद्यापीठाने तीस वर्षांच्या अथक संशोधनातून विकसित केलेली योगिक जीवनशैली अंगीकारल्यास मधुमेहामुळे निर्माण होणारी गुंतागुंत टाळता येते. मधुमेह असूनही आनंदी जीवन जगता येते हे यातून सिध्द झालेले आहे’ असे त्या म्हणाल्या. डॉ. राठी यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून उपस्थितांना आहार -विहार व यम नियम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. ीरपक्षरू मालपाणी यांनी संगमनेरमध्ये मागील वर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगितले. अनेक प्रशिक्षक नेमून जिल्ह्यात विविध केंद्रांवर मधुमेहींना शास्त्रशुद्ध योगासनांचे धडे देण्यात आले. त्यातून खूप सकारात्मक बदल दिसून आले. रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने आटोक्यात आल्याने अनेकांच्या गोळ्यांचे प्रमाण कमी झाले. उत्साह वाढला. अशा प्रकारे प्रतिसाद मिळत राहिल्यास मधुमेह नियंत्रित भारत अभियानाचे जिल्ह्यातील उद्दीष्ट आपण सर्व मिळून नक्कीच पूर्ण करू’ असे डॉ. मालपाणी म्हणाले. ध्रुव अकडमी मध्ये योगाभ्यास करून स्थूलपणा घालविण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. सुनंदा राठी यांच्या मार्गदर्शनाखाली साधलेल्या यशाचे उदाहरण त्यांनी श्रोत्यांच्या समोर ठेवले. डॉ.चुडीवाल यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मधुमेही रुग्णांना वैद्यकीय दृष्ट्या महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. सर्वांचे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मागील अहवालांच्या तुलनेत खूप सुधारले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मधुमेहींनी विचारलेल्या शंकांचे त्यांनी समाधान केले. नगर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर मधुमेहींना योगप्रशिक्षण देणारे प्रशिक्षक प्रणिता तरोटे, नेहा हळबे, मनाली मगर-कदम, मयुरी कांबळे, प्रगती नाईकवाडी, अश्विनी काळे, माधवी धट, आदींचा सत्कार रामकुमार राठी यांच्या हस्ते करण्यात आला.