अवश्य वाचा


  • Share

चोरट्यांपुढे संगमनेर पोलीस यंत्रणा हतबल शहरात भरदिवसा सोने लुटीच्या घटना सुरुच

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात महिलांच्या अंगावरील दागीणे ओरबाडून लुटण्याचा सिलसीलाच सुरु असुन शहरात हे सोने साखळी चोरणारे चोरटे सैराट झाले आहे. तर इतक्या घटना घडूनही पोलिसांना या चोरट्यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाल्यासारखी दिसत आहे. पोलिसांच्या या हतबलतेमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र दहशतीखाली वावरताना दिसत आहे. शहरातील बसस्थानक, अकोले बायपास, मालदाड रोड, नविन नगर रोड, नाशिक रोड, अशा काही महत्वाच्या व नेहमी वर्दळीच्या ठिकाणी हे चोरटे भर दिवसा लुटमार करत आहे. पायी जाणार्‍या महिलांच्या अंगावरील दागीने धुमस्टाईलने ओरबाडून पसार होत आहे. आरडाओरडा करेपर्यंत व कोणी मदतीस येई पर्यंत हे चोरटे घटनास्थळावरुन गायब होतात. संगमनेर शहरात व उपनगरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत व दररोज घडत आहे. मात्र या घटनांचा व चोरट्यांचा तपास लागत नसल्याने जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे घटना घडल्यानंतर त्याची फिर्याद द्यावी की नाही ? असा प्रश्‍न पिडीतांना पडत आहे. दरम्यान काल गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास शहरातील नाशिक पुणे महामार्गावर मुरली शांकुतल कॉम्पलेक्स समोर या ठिकाणी श्रीमती. खोजे मॅडम यांच्या गळ्यातील सुमोर अडीच तोळे सोन्याचे गंठण चोरट्यांनी धुमस्टाईलने येऊन लुटून पसार झाले. अवघ्या काही सेकंदात चोरट्यांनी डाव साधला व पसार झाले. या घटनेनंतर श्रीमती. खोजे मॅडम या शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या असता पोलीसांनी त्यांना गोड बोलून व तुमचे सोने लवकरच सापडून देऊ असे म्हणत तक्र्रार दाखल न करताच काढून दिले. सोनसाखळी चोरीच्या अगोदरच इतक्या घटना घडल्या आहेत व त्याचा तपास लागत नसल्याने आणखी हे नवे झंझट नको म्हणून पोलीस आता अशा गंभीर घटनांना नोंदवुन घेत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शहरातील नविन नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये व व्यापारी बँका आहेत. त्यामुळे या मार्गावर पैशाची मोठ्या प्रमाणावर ने -आण केली जाते असे असतांना या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या उपाययोजना करणे गरजेचे असतांना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच चोरीच्या घटना घडत आहे. पालिकेच्या वतीनेही शहरातील महत्वाच्या ठीकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते मात्र त्याचे घोडे कुठे आडले माहित नाही. तसेच पोलिस यंत्रणेकडून शहरात पेट्रोलींग केले जाते. मात्र अनेक वेळा नको त्या ठिकाणी हे पेट्रोलिंग चालत असते. व त्याचाच गैरफायदा घेत चोरटे डाव टाकत असतात. सोनसाखळी चोरणारी टोळी ही श्रीरामपुन व शिर्डी येथील आहे. व त्यांचा ठावठिकाणाही पोलिसांना माहित आहे मात्र तरीही या चोर्‍यांचा तपास एका पाठोपाठ एक घटना घडत आहे व नागरिकांच्या कष्टाचे, घामाचे पैसे चोरटे आरामात लुटून नेत आहे. या चोरट्यांपुढे पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी व हतबल झाली असुन आता आपले रक्षण कोण करणार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहे.