अवश्य वाचा


  • Share

अवकाळी पावसाच्या पिडीतग्रस्तांना तात्काळ मदत द्या - आ. डॉ. तांबे

संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा, माळवाडी, केळेवाडी येथील वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतातील पिकांचे, घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर ताांबे यांनी केली आहे. पठार भागातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी प्रसंगी त्यांनी ही मागणी केली. यावेळी समवेत सभापती अजय फटांगरे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी कारभारी नवले, सरपंच विकास शेळके, बबन कुर्‍हाडे, बापू जाधव, सुहास वाळूंज, अ‍ॅड.सुहास आहेर आदींसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.डॉ.तांबे यांनी यावेळी नुकसान ग्रस्त भागाला समक्ष भेटी देवून पाहणी केली. व घरपडझडीमुळे नुकसान झालेल्या नागरीकांची विचारपुस केली. तसेच नागरिकांनी घरे, गोठे तसेच शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आ.तांबे म्हणाले कि, शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अगोदरच शेतकरी मोठया प्रमाणात अडचणीत आला आहे. त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग मोठा हवालदिल झाला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सतत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अवकाळी पावसाने अनेकांच्या फळबागा व घरे उध्दवस्त झाली आहे. शासनाने या सर्व शेतकरी वर्गाला दिलासा देतांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. दोन तास या परिसरात चाललेल्या पावसाने व त्यातही गारांच्या मार्‍यामुळे डाळींब, द्राक्षाच्या बागा, टॉमेटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून गेली. पाने व फुलोरा झडला. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या पावसाने परिसरातील काही तलाव पूर्ण भरले तसेच लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने अकलापूररस्ता पाण्याखाली जाऊन वाहतुक बंद झाली होती. या वादळाने व गारांनी रस्त्याच्या कडेच्या बर्‍याच झाडांचे ही मोठे नुकसान झाले.वार्‍याच्या मार्‍याने झाडे उन्मळून पडली. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनाला व पदाधिकार्‍यांना नुकसानग्रस्त भागाला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी करुन तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी अनेक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.