अवश्य वाचा


  • Share

पठार भागाला अवकाळीचा तडाखा- पिकांना मोठा फटका

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव, बोटा, माळवाडी, केळेवाडी, अकलापूर, गावाला काल दुपारी साडेतीन नंतर वादळी वार्‍यासह आलेल्या जोरदार पावसाने शेतातील पिकांचे, घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. तर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी पठार भागातील पिडीत भागाची पाहणी करत प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले. दोन तास चाललेल्या पावसाने व त्यातही गारांच्या मार्‍यामुळे केळवाडी हे जवळपास पूर्ण बागायती गाव असलेले क्षेत्र व येथील डाळींब, द्राक्षाच्या बागा, टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून गेली. पाने व फुलोरा झडला. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या पावसाने परिसरातील काही तलाव पूर्ण भरले तसेच लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने अकलापूर रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतुक बंद झाली होती. दुपारी साडेतीन वाजता सुरु झालेले हे थैमान सुमारे दोन तास सुरु होते. वादळी वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने झाडांबरोबरच विजेचे पोल उखडून पडले. अचानक आलेल्या पावसामुळे डोंगर दर्‍यातून धो-धो पाणी वाहू लागले. अवकाळी पाऊसाने काढणीस आलेल्या डाळींबांना मोठा फटका बसला. शेततळ्यातील कागदाचे प्रचंड नुकसान झाले. काढून ठेवलेला कांदा पावसात भिजला. या वादळाने व गारांनी रस्त्याच्या कडेच्या बर्‍याच झाडांचे ही मोठे नुकसान झाले. वार्‍याच्या मार्‍याने झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर काही भागात प्रचंड गारपिट झाली या गारपिटीमुळे बबनराव शेळके या शेतकर्‍याच्या कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये वादळ घुसल्याने व गारपिट झाल्याने सुमारे दोन हजार कोंबड्या व त्यांची पिल्ले मृत्यूमुखी पडली. या सर्व पार्श्‍वभूमीवर नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी खा. सदाशिव लोखंडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीपराव साळगट तसेच बोटा गावचे सरपंच विकास शेळके, माजी पं.स. सदस्य बापू जाधव, बबनराव कुर्‍हाडे, अशोक जाधव, पोलीस पाटील संजय जठार, रखमा पाडेकर आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.