अवश्य वाचा


  • Share

संगमनेरात गंठण चोरी सत्र सुरूच

संगमनेर(प्रतिनिधी) संगमनेर शहरातील गणेशनगर येथून पायी जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सात तोळे सोन्याचे गंठण ओरबाडून दोघा चोरट्यांनी पल्सर मोटारसायकलवरुन धूम ठोकल्याची घटना गुरुवार दि. 4 मे रोजी दुपारी घडली. सदर महिलेचे सात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरी गेले, मात्र संगमनेर शहर पोलिसांनी दप्तरी साडेचार तोळे सोन्याच्या चोरीची नोंद केली आहे. 20 दिवसांतील गंठण चोरीची ही दुसरी घटना आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गोविंद ओमासे यांचा गुन्हेगारांवर कुठल्याच प्रकारचा वचक राहिला नसल्याची चर्चा शहरात सुरु आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील इंदिरानगर गल्ली क्रमांक 10 याठिकाणी सरीता प्रकाश माने ही महिला राहत आहे. गुरुवारी गणेशनगर येथील एका मंगल कार्यालयात लग्नासाठी गेल्या होत्या. लग्न आटोपून पुन्हा त्या दुपारी इंदिरानगर याठिकाणी येत असताना समोरुन पल्सर मोटारसायकलीवरुन येणार्‍या दोघा अज्ञात चोरट्यांनी जवळ येताच माने यांच्या गळ्यातील सात तोळे सोन्याचे गंठण ओरबाडून धूम स्टाईलने पोबारा केला. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापतही झाली आहे. त्यांनी जोरजोराने आरडाओरडाही केला, पण तोपर्यंत चोरटे काही क्षणांत दिसेनासे झाले. याप्रकरणी सरिता माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र शहर पोलिसांनी सात तोळे गंठणा एैवजी साडे चार तोळे सोन्याच्या गंठणाच्या चोरीची नोंद केली आहे. 20 दिवसांपुर्वी अशाच पध्दतीने शहरालगत असणार्‍या राजापूर रोडवरील हॉटेल दत्त समोर पायी जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण ओरबाडून दोघा अज्ञात चोरट्यांनी पल्सर मोटारसायकल वरुन पोबारा केला होता. एकूण 80 हजार रुपये किमतीचे हे सोन्याचे गंठण होते. रंजना नवले ही महिला सुध्दा राजापूर रोडवर असणार्‍या एका मंगल कार्यालयात आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी पायी जात होती. यापुर्वीही नविन नगर रोड, बसस्थानक परिसर, मालदाड रोड, नविन अकोले रोड आदि ठिकाणाहून महिलांच्या गळ्यातील गंठण चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. ह्या सर्व घटनांमध्ये चोरटे पल्सर मोटारसायकलच वापरत आहेत. गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराची फिर्याद पोलिसांनी नोंदवत याची माहिती माध्यमांपासून दडवली. मंगळसूत्र चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकुळ घातला असुन पोलिसांना या चोरट्यांचा शोध लावण्यात सपशेल अपयश आले आहे. पोलिस डायरिला संबधित महिलेचे केवळ 59 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्यांचे गंठण लांबविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार तपास करत असून गेल्या दोन दिवसात पोलिसांना आरोपीचे धागेदोरे देखील मिळवता आलेले नाही.