अवश्य वाचा


  • Share

समशेरपूर येथे महिलांनी अवैध दारूसाठा केला उध्वस्त

सावरगांव पाट (प्रतिनिधी) समशेरपूर येथे महिलांनी अवैध दारूविक्री विरोधात गावातून मोर्चा काढला. अवैध दारूविक्री करणार्‍या धाब्यांवर महिलांनी धाड टाकत अवैध दारूच्या बाटल्या रस्त्यावर पोलीस प्रशासना देखत फोडल्या. अवैध दारूविक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी उपस्थित महिलांनी केली. समशेरपूर येथे दारूबंदी बाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील व समशेरपूर फाट्यावर सुरू असलेले अवैध दारूविक्रीचे दुकाने बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु महिलांनी अचानक आपला मोर्चा दारूच्या दुकानांवर वळविला. त्यापूर्वी दारूविक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करून पलायन केले होते. या प्रसंगी पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा समशेरपूर येथे दाखल झाला होता. पोलसांसमोर महिलांनी दारूचा साठा उध्वस्त केला. रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडून महिलांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी दारूची वाहतूक करणारी एम.एच.15,सी.एम.9395 नंबरची मारूती गाडी महिलांनी पकडून दिली. या गाडीमध्ये देशी व विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. अवैध दारू विक्री करणार्‍या ढाब्यांवर व दुकांनांवरर कडक कारवाई करावी. अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा महिलांनी दिला. अशा आशयाचे निवेदन उपस्थित महिलांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे. याप्रसंगी पोलीस प्रशासनाचे पी.एस.आय.नितिन बेंद्रे, एस.के.भांगरे, आर.डी.ढोकणे आदि उपस्थित होते. दारूबंदी विरोधी मोर्चा मध्ये मिराबाई दराडे, सुनिता बेणके, रोहीणी गाडेकर, सिमा चव्हाण, पुजा चोखंडे, शालिनी कोरडे, सुनंदा ढेकणे, सुनिता मुखेकर, पुष्पा सोनवणे, मिरा ढोन्नर, विजया चव्हाण, सुमन बेदरकर, मुमताज पटेल, शोभा मुखेकर, स्वाती मुखेकर, सारिका सहाणे, भारती पोटे, कलाबाई मुंढे, संगिता शेलार, चित्रा एखंडे, राधा बेणके, वर्षा बेणके, जया गोरे, शांताबाई बेणके, संगिता नेहरकर, सुलोचना बेदरकर आदिंसह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी अवैध दारूविक्रत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाच्या वतीने पी.एस.आय. नितिन बेंद्र यांनी दिले.