अवश्य वाचा


  • Share

शुक्रवारी भंडारदरा गार्डनमध्ये आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा

अकोले (प्रतिनिधी) अकोले तालुक्यात आदिवासी कुटूंबातील मुलांची स्वतंत्र लग्न लावण्याऐवजी विवाहात मानपान व आहेर न घेता सामुदायिक विवाह सोहळ्यातच ती करावीत, अन्यथा त्यांच्याकडून प्रत्येकी 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, अशी भूमिका अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, राजूर गटातील जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता भांगरे यांनी शेंडी येथे आदिवासी समाजाच्या बैठकीत जाहीर केली. यात वधूवरांचे जन्म दाखले पाहूनच विवाह करण्यास मान्यता दिली जाणार असल्याने आदिवासी भागातून बालविवाह रोखण्याचा हेतूही साध्य होणार असल्याचे स्पष्ट करून लग्न झाल्यावर कोणीही वरात काढायची नाही, असेही आवाहन भांगरे यांनी केले. शेंडीचे माजी सरपंच दिलीप भांगरे, सुरेश गभाले, विजय भांगरे यांनी या आवाहनाचे जोरदारपणे स्वागत करून अकोले तालुका आदिवासी मित्र मंडळ व तालुक्यातील पश्‍चिम विभागातील वारकरी समाज संप्रदायातील धुरिणांनी या प्रस्तावास पाठिंबा जाहीर करून मंजुरी दिली. तसेच आदिवासी भागातून या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जलसंपदा विभागाच्या भंडारदरा धरणाच्या हिरव्यागार गार्डनमधून उद्या शुक्रवारी (5 मे) दुपारी एक वाजता पहिल्या आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 22 वधूवर विवाह बंधनात बंदिस्त होऊन आपल्या आयुष्यातील सुखमय संसाराची सुरूवात करणार आहेत. आदिवासी भागातील नागरिकांची आर्थिकस्थिती चांगली नसतानाही आपल्या मुली मुलांच्या लग्नासाठी ते सावकारी, उसनवारी करून, घरातील अन्नधान्य विकून किंवा जमिनी गहाण ठेवून मानपान सांभाळून सोंगाढोंगात लग्न लावतात. त्यामुळे पैशाची परतफेड करताना अनेकांना नैराश्य येणे, आर्थिक ताणतणाव निर्माण होऊन संसारात वादग्रस्त ठरणे, याशिवाय अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे यापुढे अकोले तालुक्यातील आदिवासी भागातून आपल्या मुली मुलांची लग्न स्वतंत्र न करता ती सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करूनच करावीत, असे जाहीर आवाहन अशोकराव भांगरे यांनी कले. यामुळे बालविवाह रोखण्याचा हेतू साध्य होणार असल्याचे स्पष्ट करून लग्न झाल्यावर कोणीही वरात काढायची नाही, असाही निर्णय एकमताने घेतला. त्यानुसार या मोहिमेचा शुभारंभ नियोजित 11 जोडप्यांचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा शेंडी येथील भंडारदरा धरण गार्डनच्या हिरवळीवर उद्या शुक्रवारी ( 5 मे ) दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. तसेच राजूर येथे रविवारी (14 मे) दुसर्‍या व लव्हाळी येथे मंगळवारी (23 मे) तिसर्‍या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबत बोलताना जिल्हा परिषद सदस्या सुनिता अशोकराव भांगरे यांनी सांगितले की, सामुदायिक विवाह सोहळ्याकडे आदिवासी समाजाने सामाजिक चळवळीचा एक भाग म्हणून पहावे. लग्नासाठी वधूवरांना ड्रेस, पुरोहित, मंडप, वाद्यवृंद, लाऊडस्पीकर, बेंजोपार्टी व आवश्यक खर्च मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे पालक स्वतंत्रपणे लग्न लावतील त्यांना सार्वजनिक ठिकाणी कारणांची विचारणा करण्यात येईल. प्रसंगी त्यांना 11 हजार रुपयांचा दंडाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. सर्वानी वेळोवेळी होणार्‍या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घ्यावा यासाठी विशेषण परिश्रम घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी प्रतिवर्षी देणगीदार संख्या वाढत जाईल व आदिवासी भागातील लग्नाच्या जिवघेण्या रुढी व परंपरा बदलण्यासाठी या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे. यादृष्टीने अकोले तालुका आदिवासी मित्र मंडळ व तालुक्यातील पश्‍चिम विभागातील वारकरी समाज संप्रदायातील धुरिणांनी आदिवासी बांधवांना आपल्या नियोजित वधूवरांचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात घडवून आणण्यासाठीची जनजागृती चालविली आहे. आदिवासी गांवातून प्रचार व प्रसार मोहीम राबविण्यात आली आहे. याकार्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यशही मिळताना दिसत आहे. वारकरी संप्रदायातील लोकांनी गावागावांत जाऊन मुलांच्या विवाहात मानपान व आहेर न करण्याची व लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यातच करण्याचा आग्रह धरला. सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यास वधुवर दोन्ही पक्षाचा खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याने आर्थिक बचतीचे महत्त्व लक्षात आणून दिले. यासाठी विठ्ठल बापु खाडे, आंनदा खाडे, हिरामण सोनवणे, पांडुरंग ईदे, बाबुराव अस्वले, तुकाराम भोरु गभाले, हभप देवराम महाराज ईदे, आंनदराव मधे, मंगळा पटेकर, राजेंद्र मधे, कुडंलिक खाडे, पुनाजी सगभोर, देवराम भांगरे, सुरेश गभाले, सुरेश घाटकर, मधु भांगरे, लक्ष्मण उघडे, युवराज उघडे, यशंवंत बांडे, चंदर बांडे, शंकर झडे, शंकर घारे, सोमा नावजी मधे, लक्ष्मण भांगरे, सारोक्ते गुरुजी, दशरथ झडे, मुरलीधर मधे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.