अवश्य वाचा


  • Share

यात्रेवरून परतणार्‍या गाडीला अपघात- संगमनेरची महिला ठार

अकोले (प्रतिनिधी) आदिवासी भागाचे मुख्य केंद्र समजल्या जाणार्‍या राजूर गावातील उरुसाच्या यात्रेतून संगमनेरला परतणार्‍या व्यापार्‍यांच्या गाडीला झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर सहा जण जखमी झाले असून त्यांना संगमनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मरण पावलेल्या महिलेचे हिराबाई सोजर कातारी (वय 60, रा.संगमनेर) असे नाव आहे. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर राजूरच्या स्मशानभूमीच्या पुढे वांग्याच्या वळणावर सायंकाळी साडेसातच्या दरम्यान संगमनेरचे लाटणे-पोळपाटाचे व्यापारी राजूर येथील उरुसाची यात्रा आटोपून संगमनेरकडे मिनी टेम्पोने जात असताना रस्त्यालगत असणार्‍या सुमारे 15 ते 20 फूट खाली खड्डयात पलटी झाल्याने एक महिला जागीच मरण पावली. तर संगमनेर येथील शकीला हरिसिंग कातारी (वय 60), कुंदन भानुदास कातारी (वय 23), सोजर नानाभोंड कातारी (वय 50), छाया दिपक कातारी (वय 35), भानुदास श्रीपत कातारी (वय 50) तसेच अकोले येथील शाहूनगरच्या दुर्गाबाई शिंदे (वय 45) या जखमी झाल्या असून त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात राजूर पोलीस ठाण्यापासून जवळच घडला, मात्र याची कुठलीही माहिती राजूर पोलिसांना नव्हती. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या अपघातामुळे कोल्हार-घोटी राज्य मार्गावर वळणावर होणारे अपघात हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.