अवश्य वाचा


  • Share

जात निर्मुलनाच्या गप्पा करणार्‍यांनीच जातीचे पक्ष काढले- अंधारे

संगमनेर (प्रतिनिधी) भारतामध्ये हजारो वर्षांपासून जातीय वादाचे विष पेरले जात आहे. दरम्यान, जात निर्मुलनच्या गप्पा करणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी जातीचे पक्ष स्थापन करून पुन्हा एकदा जातीयवादाला खतपाणी घालण्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुषमा आंधारे यांनी केला. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आंबेडकर नगर, घुलेवाडी येथे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ.डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, जि.प. सदस्य मिलिंद कानवडे, पं. स. सदस्या सुनंदाताई जोर्वेकर, नगरसेवक हिरालाल पगडाल, सेवानिवृत्त ए.सी.पी. राजदुत रूपवते, बी.आर. कदम तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी फुले, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अजीजभाई शेख, चंद्रकांत पवार, मेजर लक्ष्मण ढोले, शालनताई शेळके आदींचा समावेश आहे. यावेळी बोलताना सुषमाताई आंधारे म्हणाल्या की, समाजात आजही जातीपातीचे प्रचंड स्तोम मोजविले जात आहे. वोट बँकेच्या नावाखाली जातीचे समुह संघटीत केले जात असून त्याद्वारे आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने होत आहे. त्या-त्या समाजातील एका नेत्याला पुढे आणून त्याला त्या जातीचा ‘पोष्टर बॉय’ म्हणून पुढे केले जात आहे व त्यातून सत्तेचे समिकरण जुळवले जातात. जात निर्मुलनाच्या गप्पा करणारे याच पुढार्‍यांनी जातीचे राजकीय पक्ष स्थापन करून जातीय वादाला खतपाणी घातले आहे. मोदी सरकारने देशातील जनतेला मुर्ख बनवले असून जनता ही मुर्खच्या या नंदनवनात वावरताना दिसत आहे. मेरे प्यारे देशवासियों असे म्हणत त्यांनी गॅस सब्ससिडी सोडण्यात सांगितली जनतेेनेही ती स्वखुशीने सोडली मात्र याचा फायदा न होता जनतेला तोटा सहन करावा लागला तशीच अवस्था काळा धनाच्या नावाखाली नोटबंदीची झाली. या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर निघालाच नाही तर उलटपक्षी सर्वसामान्य जनतेला त्याचा तोटाच सहन करावा लागला अशीच अवस्था इतर अनेक निर्णयाची झाली आहे मात्र जनता आजही त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहे. जनतेने आता सावध होऊन अशा लबाड व जातीयवादी नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष अरविंद सांगळे, कार्याध्यक्ष मिलिंद सोनवणे, सचिव राजीव साळवे, विशाल निळे, अनिल शेळके, डी.के. जमधडे, संजिवन साळवे, के.जी. भालेराव, केशवराव मुर्तडक यांच्यासह अनेक मान्यवर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.