अवश्य वाचा


  • Share

मागण्या मान्य होत नसल्याने कागदपत्रांची होळी

अकोले (प्रतिनीधी) सतरा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही टाहाकारी येथील व वडदरी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने महाराष्ट्र दिनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी अकोले तहसिल कार्यालयासमोर कागदपत्रांची होळी करुन शासनाचा निषेध केला. टाहाकारी येथील वडदरी तलावासाठीच्या प्र्रकल्पात 24 शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांवर शासनाने 900 ते 1000 रुपये गुंठ्याप्रमाणे जमिनीचा मोबदला देवून शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन पाठविले होते. मात्र कुठलीही दखल घेतली गेली नाही म्हणून संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त् शेतकर्‍यांनी महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर कागदपत्रांची होळी करीत निदर्शने केली. या प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व बादशहा एखंडे व अशोक एखंडे यांनी केले. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी सांगितले, शासनाकडे व कोर्टात हेलपाटे मारुन थकलो आहेत. यातील 11 शेतकरी मरण पावले आहेत. गेल्या 17 वर्षात अनेक निवेदने शासनाला दिलीत. मात्र हा प्रश्‍न सुटु शकला नाही. त्यामुळे आम्ही कागदपत्रांची होळी करत आहे व यापुढे आणखी व्यापक आंदोलन उभारणार असल्याचेही सांगितले. या आंदोलनात वाळीबा एखंडे, माधव एखंडे, इंदूबाई एखंडे, रावसाहेब एखंडे, किसन एखंडे, जगन्नाथ एखंडे, जनाबाई एखंडे, सखाराम एखंडे आदींसह प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होते.