अवश्य वाचा


  • Share

श्रमिकांच्या गीतांनी समाजमन ढवळून निघेल- आ.पिचड

अकोले (प्रतिनिधी) श्रमिक कष्टकरी, शेतकरी, महिला यांची भांडवलदार व शोषित घटकांकडून मुक्तता होण्यासाठी शाहीरांनी डफ हाती घेतला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतीमालाचे पाडलेले बाजारभाव यामुळे देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. श्रमिकांच्या या गीतांनी पुन्हा एकदा समाजमन ढवळून निघेल अशा शब्दांत आमदार वैभवराव पिचड यांनी भावना व्यक्त केल्या. अकोले कॉलेजच्या बुवासाहेब नवले नाट्यगृहात संगमनेर येथील कॉ. दत्ता देशमुख प्रतिष्ठानच्या गाणी श्रमिकांची या कार्यक्रमाचा शुभारंभ पिचड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कम्युनिस्ट नेते मधुभाऊ नवले, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, शेतकरी नेते दशरथ सावंत, प्रा. विठ्ठल शेवाळे आदि उपस्थित होते. मोहन दत्ता देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्याच आवाजातील शाहीर अमर शेख यांच्या ’विश्‍व व्यापी जन गणा’ या गणाने झाली. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ’जग बदल घालूनी घाव’ व ’उजाळला लकाकला समदा डोंगर माथा समदा’ ही शिवाजी कांबळे यांनी पहाडी आवाजातगायलेल्या गीतांनी श्रोते रोमांचित झाले. बाजार समितीत हमाली करणार्‍या कामगाराची विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱी मुलगी प्रज्ञा भालेराव हिने गायलेली आशयसंपन्न गिते रसिक श्रोत्यांची दाद घेऊन गेली. ’चल ग हिरा, चल ग मिरा चल ग बायजा बाई’, ’या देशाच्या बायांना, आया बहिणींना सांगाया जायाचे हाय गं, एकी करून अन लढा पुकारून ह्यो तुरूंग फोडायचा हाय गं’, ’आहो कारभारी तुमची गडबड लई भारी’, ’तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान’, ’बाई मी धरण बांधिते’;’ लोकशाहीचा वृक्ष तोडूनी’, ’रक्ताने ग रंगलेला लाल बावटा’, ’बुध्द कबीर भिमराव फुले या भूमीवर जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले गं’ या गीतांनी उंची गाठली. किशोर देशमुख यांच्या ’तू हिंदु बनेगा ना मुसलमान’, ’गर्जा महाराष्ट्र माझा’, ’तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान’ या गाण्यांनी कार्यक्रमाचा कळस केला. ’एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती’ हा प्रविण घुले यांचा प्रबोधनपर फटका दाद मिळवून गेला. मोहन देशमुख यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांची ’माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहीली’ ही लावणी कार्यक्रमाचा आत्मा ठरली. तसेच त्यांनी म्हटलेली ’ही आग भुकेची’, ’उठली पुन्हा जनता’ या शाहीर अमर शेख यांची गिते जून्या जाणत्यांना आठवण देवून गेली. शाहीर रेवणनाथ देशमुख यांचे ’गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या प्रबोधनपर कीर्तनाने श्रोत्यांचे मनोरंजन केले. ढोलकीची साथ गणेश बिडवे यांनी दिली. हार्मोनियम साथ एकनाथ भागवत, कोरस साथ शिवा व भिवा तुपसुंदर, प्रथमेश बिडवे, किरण खैरनार, पंकज जाधव, मोहन कडलग, प्रज्वल भालेराव यांनी दिली. निवेदन पत्रकार नंदकुमार सुर्वे यांनी केले. मधुभाऊ नवले यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली.