अवश्य वाचा


  • Share

आदिवासी शेतमजुराचा मुलगा संदिप उघडे झाला सहाय्यक अभियंता

संगमनेर (प्रतिनिधी) वडील शेतात शेतमजुरीचे काम करतात, घरात कुटूंबातील सदस्य अशिक्षीत मोलमजुरी करुन आदिवासी कुटूंब चालवण्याची कसरत करत आहेत. परंतु आपल्या मुलाला शेतमजूरीचे काम करु नये यासाठी नाथु उघडे यांनी मोठ्या जिद्दीने मुलाला शिक्षण दिले. आणि त्यांचा मुलगा संदिप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाला. संगमनेर तालुक्यातील मेंगाळवाडी नांदुरी दुमाला येथील नाथु मुक्ता उघडे हे आदिवासी कुटूंब मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करत आहेत. मात्र आपल्या तीन मुलांना शिकविण्याची जिद्द मनाशी बाळगुन नाथु उघडे यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांचा मोठा मुलगा संदिप याला बीई सिव्हील पर्यंत शिक्षण दिले. संदिप यांनेही वडीलांच्या कष्टाची जाण ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा दिली. यात तो यशस्वी झाला. नाशिक विभागातील नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाला. संदिप याने यश संपादन केल्याने माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यशोधन येथे संदिप याचा सत्कार झाला यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुध संघाचे संचालक विलास कवडे आदिं उपस्थित होते. त्याच्या यशाचे कौतुक करत आमदार थोरात यांनी त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आदिवासी कुटुंबात वाढलेल्या संदिप याला सुरुवाती पासूनच आपल्या गरीब परिस्थितीची जाण होती. शालेय जीवनापासूनच त्याने कठोर मेहनत घेतली. त्याचे इयत्ता 1 ली व दुसरी चे शिक्षण सारोळे पठार येथील आदिवासी आश्रम शाळेत झाले. तीसरी ते सहावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडगाव, सातवी ते दहावी पर्यंत राजीव गांधी विद्यालय निमज व 11 वी ते 12वी ओहरा कॉलेज संगमनेर व सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथे बी.ई.सिव्हील पुर्ण केले. आदिवासी कुटूंबात जन्माला आल्यानंतर ही जिद्दीने पुढचे शिक्षण घेवुन संदिप याने समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.