अवश्य वाचा


  • Share

पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यासाठी घारगाव येथे शेतकर्‍यांचा रास्तारोको

घारगाव(प्रतिनिधी) अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातुन सोडलेल्या आवर्तनाचे पाणी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव,अकलापुर, नांदुर खंदरमाळ, साकुर भागातील लाभार्थी गावांना मिळावे यासाठी संतप्त ग्रामस्थांनी व शेेतकर्‍यांनी आज मंगळवारी सकाळी घारगाव येथे नासिक पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पिंपळगाव खांड धरणाचा पाणीप्रश्‍न पुन्हा एकदा पेटला आहे. सुमारे एक महिन्यापुर्वी पिंपळगाव खांड धरणातुन लाभार्थी गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी आभाळवाडीच्या पुढे सोडले नाही. त्यामुुळे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक लाभार्थी गावांना या आवर्तनाच्या पाण्यापासुन वंचीत रहावे लागले. पर्यायाने मुळा नदिवरील घारगाव, नांदरखंदरमाळ, अकलापुर, साकुर परिसरातील अनेक केटीवेअर व पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे झाले. पर्यायाने शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले. येथील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी भटकंती करण्याची वेळ आली. त्यामुळे पठारभागात प्रचंड असंतोष उङ्गाळून आला. पर्यायाने येथील संतप्त ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर तहसीलदार व संबंधीत प्रशासनाने लाभार्थी गावांना पाणी देण्याचे कबुल केले, त्यामुळे हे आंदोलन काही काळ स्थगीत करण्यात आले होते. दरम्यान पिंपळगाव खांड धरणातुन गुरुवारी पुुन्हा आवर्तन सोडण्यात आले. मात्र या आवर्तनाचे पाणीही चास आणी पिंपळदरीच्या पुढे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे घारगाव, अकलापूर, साकुर, नांदुरखंदरमाळ सह अनेक लाभार्थी गावच्या शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले. या पार्श्‍वभुमीवर आज सकाळी पठार भागातील लाभार्थी गावच्या ग्रामस्थांनी घारगाव येथे पुणे-नाशिक महामार्गावर भर उन्हात पाण्यासाठी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करत, प्रशासनाचे लक्ष वेधले व लाभार्थी भागाला पाणी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पठार भागातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.