अवश्य वाचा


  • Share

अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच, कारवाईत मात्र भेदभाव

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात पालिकेकडून राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहिम आज सलग तिसर्‍या दिवशीही सुरू ठेवण्यात आली. मात्र या अतिक्रमण हटाव मोहिमेत काही धनदांडग्यांना अभय देऊन भेदभाव ही करण्यात आला तसेच आज पालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाने पुन्हा एकदा शहरातील अतिक्रमण हटविलेल्या भागात पाहणी करून व्यापार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा अतिक्रमण केलेल्या दुकानदारांचे सामान जप्त करण्यात आले तर अतिक्रमण काढल्याने मोकळ्या झालेल्या जागांवर अवैध प्रवासी वाहनांनी ताबा मिळविला असून त्याकडे मात्र प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. शहरात पालिकेची अतिक्रमण हटाव मोहिम मागील तीन दिवसांपासून राबविण्यात येत आहे. प्रांतधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अजय देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, पो.नि. गोविंद ओमासे, पो.नि. गोकुळ औताडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सुरू आहे. दरम्यान, काल शहरातील मेनरोड, सय्यद बाबा चौक, अशोक चौक, शिवाजी महाराज पुतळा परिसरात जोरदारपणे ही मोहिम राबविण्यात आली. यावेळी या पथकाकडून अनेक पक्की बांधकामे तसेच रस्त्यात बांधलेले ओटे जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले. नेहरू चौकात अशोक स्तंभ परिसरात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणामुळे हे स्मारक पुर्णता झाकून गेले होते मात्र येथील सर्व अतिक्रमण पालिकेेने अखेर काढून टाकल्याने अशोक स्तंभाने मोकळा श्‍वास घेतला आहे. येथीलच नरेंद्र टेक्सस्टाईल्स या मोठ्या कापड दुकाना समोरील बेकायदा ओटाही पालिकेने जमिनदोस्त केला. मेनरोड व सय्यद बाबा चौक येथील अनेक ओटे तोडण्यात आले मात्र या कारवाई दरम्यान अनेकांनी विरोध केल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. या संपूर्ण कारवाईत राजकीय हस्तक्षेप झाल्याने कारवाईत भेदभाव करण्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे. दरम्यान, आज तिसर्‍या दिवशी अकोले नाका, बाजारपेठ या महत्वाच्या ठिकाणी पालिकेने अतिक्रमण मोहिम राबविली. बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाल्याने प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने वाहतूकीसाठी अडथळा ठरणारे अनेक ओटे व पायर्‍या तोडून टाकल्या. दरम्यान या कारवाईची धास्ती घेतल्याने अनेक व्यापार्‍यांनी स्वतःहून आपले अतिक्रमणे काढून घेतली. मंगळवारपासून ही अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. पहिल्या दिवशी ज्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यंानी पुन्हा एकदा रस्त्यावर अतिक्रमण केले त्यामुळे आज सकाळी पालिकेच्या एका पथकाने या अतिक्रमण धारकांना शिस्त लावत अतिक्रमण न करण्याच्या सुचना दिल्या तसेच काही दुकानदारांचे साहित्य जप्त केले. या संपूर्ण कारवाईनंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासन घेणार असून अतिक्रमण करणार्‍यांचे साहित्य जप्त करण्याचा इशारा यापूर्वीच मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिला होता. त्याप्रमाणे आजची ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेचा आजचा शेवटचा दिवस असून गरज पडल्यास पुन्हा एकदा ही मोहिम राबविली जाईल असा इशाराही मुख्याधिकारी बांगर यांनी दिला आहे. दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनेक व्यापार्‍यांचे हजारो-लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या मोहिमेनंतर शहरातील रस्ते मोकळे झाले आहे. यापुढे या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.