अवश्य वाचा


  • Share

तालुक्यात 10 गावे 18 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यात दिवसेंविस तापमानात वाढच होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरींची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील 10 गावे 18 वाड्यांना शासकीय 8 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा चालू असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे यांनी दिली. संगमनेर तालुक्यात कडक उन्हाच्या झळ्या बसायला सुरूवात झाली असून दिवसेंविस तापमानात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात तापमान 40 ते 42 अंश सेल्सियसपर्यत जाऊन पोहचले आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका हातपंपाची पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे पठार भागातील काही वाड्या- वस्त्या, तळेगाव पट्टा, शिरसगाव धुपे, सावरचोळ, पिंपळगाव माथा, बोटा परिसरातील काही वाड्या-वस्त्या आंबीदुमाला अशा अतिदुर्गम भागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर जनावरांनाही पाण्याची नितांत गरज आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमधील पाणीपुरवठ्याचे ठराव अद्याप काही कामचुकार ग्रामसेवक पंचायत समितीकडे जमा करण्यास विलंब करत आहेत. त्यामुळे या गावांना कधी पाण्याचे टँकर सुरू होणार आहे याची वाट पाहावी लागत आहे. दुष्काळाचा विचार करता टँकरची मागणी होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा. असे आदेश देत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले आहेत. चालू आठवड्यात 1 गाव व तीन वाड्या यामध्ये पळसखेडे, खांबे, पारेगाव बुद्रुक या तीन गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. पुढील नियाजनात मागणीनुसार 9 गावे 45 वाड्यांचे प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. यापुढेही मागणी तसा पुरवठा या युक्तीप्रमाणे तालुक्यातील ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई असेल अशी गाव व वाड्यावस्त्यांनी पंचायत समितीकडे तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून ते मंजूर करून आणू अशी माहिती उपसभापती नवनाथ अरगडे यांनी दिली.