अवश्य वाचा


  • Share

चंदनापूरीत धाडसी चोर्‍या - सात तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरी

चंदनापुरी (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्याचा ग्रामिण भाग अज्ञात चोरट्यांनी अक्षरश: टार्गेट केला आहे. सारोळे पठार येथे अकरा घरफोड्या केल्याची घटना ताजी असतानाच पन्हा चोरट्यांची शुक्रवार दि. 13 जुलै रोजी पहाटे चंदनापुरी गावात धुमाकूळ घातला असून सात ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. एकूण सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा ऐवज चोरून पाबोरा केला आहे. त्यामुळे आता या चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे शुक्रवार दि. 13 जुलै रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सात ठिकाणी घरफोड्या करत सात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. चोरटे नेमकी कोणत्या दिशेने पळून गेले. त्यासाठी नगरच्याश्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. वाढत्या चोर्‍यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंदनापुरी याठिकाणी जयश्री किशोर बोर्‍हाडे ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. गुरूवारी संध्याकाळी बोर्‍हाडे या नेहमीप्रमाणे जेवण करून झोपल्या होत्या. चोरट्यांनी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान जीन्याजवळील खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व कपाटामध्ये असणारे सात तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम सहा हजार रूपये असा ऐवज चोरला. मग या चोरट्यांनी गावातीलच सत्यभामा पर्वत राहाणे, अनिता विशाल राहाणे, विकास रंगनाथ पावसे, यशोदाबाई रावसाहेब राहाणे, अनिल संपत कढणे, सुनिल रामभाऊ कढणे यांच्याही घरांमध्ये व दुकानांमध्ये प्रवेश केला. आणि उचकापाचक करत काही ऐवजही चोरून नेला आहे. नेमका किती ऐवज गेला आहे ते मात्र पोलिसांना समजू शकले नाही. शुक्रवारी सकाळी गावामध्ये चोर्‍या झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांना समजताच त्यांच्यासह सहाय्यक फौजदार एम.बी. खान आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व ज्या ज्या ठिकाणी घरफोड्या झाल्या त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. साडेअकरा वाजेच्या सुमारास नगर येथून श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर मिस्का या श्‍वानाने मुळगंगा मंदिर ते चंदनापुरी ग्रामपंचायत पर्यंत मार्ग काढला. दरम्यान काही महिन्यापुर्वी मुळगंगा माता देवीचा चांदीचा मुकुटही चोरट्यांनी चोरून नेला होता. अद्यापही त्या चोरीचा शोध लागला नाही. तेच पुन्हा चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे धुमाकूळ घालत सात ठिकाणी चोर्‍या केल्या आहेत. याप्रकरणी जयश्री बोर्‍हाडे यांनी दिलेल्यास फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.