
संगमनेर (प्रतिनिधी)
भंडारा जिल्ह्यात एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेनंतर शासकीय व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे शासकीय अनास्थेमुळे एकही बळी जाता कामा नये अशी भूमिका घेतली. त्याच्या दुसर्याच दिवशी कोतुळ येथे पुन्हा एकदा शासकीय अनास्थेमुळे एकाचा बुडून मृत्यू झाला. आणि मुख्यमंत्र्यांचा हा दावा फोल ठरला.

तालुक्याच्या मुळा खोर्यातील कोतूळ हे बाजारपेठचे मुख्य केंद्र आहे. परंतु, कोतूळला येण्यासाठी परिसरातील गावांना मोठा विळखा मारुन यावे लागते. पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पूल बुडून गेल्याने रहदारीसाठी तो बंद करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीही प्रकारचे फलक लावून किंवा धोका म्हणून या ठिकाणी बॅरेकेट लावण्यात आले नाही. अशा परिस्थितीत शनिवारी पहाटे तीन पर्यटकांपैकी एकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेने ‘पुन्हा’ एकदा कोतूळ पुलाचा विषय ऐरणीवर आला आहे.
दरम्यान 20 डिसेंबर रोजी याच ठिकाणी आणखी एक भीषण घटना घडणार होती. मात्र सुदैवाने ती टळली.

पुण्यातील राजगुरुनगर येथील सौरंग्या टे्रकींग ग्रुपचे 15 जण कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी स्कुलबसने निघाले होते. गुगल मॅपच्या सहाय्याने तेही याच मार्गावरुन पहाटे चारच्या सुमारास त्यांची बस याच पुलावर पाण्यात येऊन अचानक थांबली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ही बस धरणात जाता जाता वाचली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. ही घटनाही केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे घडल्याचे स्पष्ट दिसते. रस्ता डांबरीकरण संपल्यानंतर अचानक पाणी लागते आणि चालकाला त्याचा अंदाज येत नाही. त्यासाठी याठिकाणी बॅरिकेटस्स, सुचना फलक लावणे गरजेचे असताना पाटबंधारे विभाग मात्र सुस्त झाल्यासारखे वागत आहे. याचठिकाणी दिवसा होडीने प्रवास केला जातो. रात्री मात्र हा प्रवास बंद असल्याने रात्रीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यत आहे.

दरम्यान शनिवारी पुण्याहून कळसूबाईला जाणारे पर्यटक गुरूसत्य राजेश्वर राक्षेकर (वय 42) व समीर सुधीर आलुरकर (वय 44) हे दोघे कारचालक सतीश सुरेश घुले (वय 34) याच्याबरोबर कारमधून (क्र.एमएच.14, केवाय.4079) जात होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास कोतूळमध्ये आले असता गुगल मॅपवर रस्ता शोधला. त्यानंतर कोतूळ ते राजूर ऐवजी कोतूळ ते अकोले रस्ता दाखविला. कोतूळ पुलानजीक आले असता कारचालकाला पुलावर पाणी दिसले. पावसाचे पाणी पुलावर आले असेल असे वाटल्याने त्याने पुलावरून गाडी घातली. थोडे अंतर पुढे गेल्यावर पाणी वाढल्याने राक्षेकर व आलुरकर दोघे पोहून बाहेर आले. परंतु कारचालक घुले यास पोहता येत नसल्याने तो कारसह बुडाला. या दुर्दैवी घटनेने तालुक्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.

दरम्यान, सन 2015 पासून कोतूळच्या युवकांनी पूल कृती समिती स्थापन करून मंत्रालयाचे उंबरठे झिजविले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सरकारने 2019 मध्ये 20 कोटी मंजूर केले. परंतु 2020 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असताना काम सुरू झालेच नाही. त्यामुळे कोतूळकरांनी 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी, 2020 असे चौदा दिवस बैठा सत्याग्रहा केला. जलसंपदाचे अधिकारी चर्चेसाठी आले असता त्यांना दोन तास कोंडून ठेवले. अखेर आमदार डॉ.किरण लहामटे, विनय सावंत व डॉ.अजित नवले यांनी मध्यस्थी करत 15 दिवसांत काम चालू करण्याचे आश्वासन दिले. पण त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने काम पुन्हा बारगळले.

प्रस्तावित कामामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव मेरी व मुख्य अभियंता जलसंपदा उत्तर विभाग यांच्याकडे आहे. त्यानंतर कार्यारंभ आदेश निघतील असे सांगितले जाते. नवीन बदलानुसार लांबी 262 मीटरऐवजी 255 मीटर ठेवण्यात आली असून 42.5 मीटरचे 6 गाळ्याऐवजी 26 मीटरचे 10 गाळे ठेवण्यात येणार आहेत. तसेच रूंदी पूर्वीप्रमाणेच 9 मीटर असून त्यात ट्रॅफिक ट्रॅकसह पादचारी पट्ट्या ठेवण्यात येणार आहेत. आता एका पर्यटकाच्या मृत्यूने जलसंपदा विभाग व मेरी यांच्याकडून तातडीने अंतिम मंजुरी मिळून कंत्राटदार पुलाचे काम चालू करतो की कोतूळकर नवीन पुलासाठी अभिनव आंदोलन करून सरकारला कार्यारंभ करण्यासाठी राजी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
