२६ हजारांच्यामांजा जप्त : दोघांवर गुन्हा दाखल

मकर संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर पतंग उडविण्याचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नायलॉनचा मांजा वापरला जातो. या नायलॉन मांज्यामुळे पशु-पक्षांना मोठा धोका होऊन त्यांची जीवीत हानी होते तसेच प्रवासी नागरीकांनाही या मांज्याचा धोका असल्याने शासनाने या मांज्यावर बंदी घातली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार पोलिसांनी असा मांजा विकणार्या व्यापार्यांवर धडक कारावाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत शहर पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या पथकाने शहरात नायलॉन मांज्या विरूद्ध धढक कारवाई सत्र सुरू करून हजारो रूपयांचा मांजा जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सुरूच राहाणार असल्याचे पो. नि. मुकूंद देशमुक यांनी सांगितले.


मकर संक्रातीनिमित्त शहरात उडविल्या जाणार्या पतंगासाठी वापरण्यात येणारा व बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणार्यांविरुध्द शहर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई केली. हा मांजा विकणार्या दोघांविरुध्द कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 26 हजारांचा मांजा जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मांजा विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविण्याचा छंद तरूणांकडून केला जात आहे. हा माजा अतिशय घातक असल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही शहरातील अनेक विक्रेते असा मांजा विकतांना आढळून येत आहे. नायलॉन मांजामध्ये अडकून पक्षी, प्राणी यांची जीवीत हानी व गंभीर दुखापत होत असल्याने – असा मांजा विकणार्यांविरुध्द कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी दिले होते. या आदेशानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक रोहिदास माळी, हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पोलीस नाईक विजय पवार, विजय खाडे, सचिन उगले, अनिता सरगैय्ये यांच्या पथकाने रविवारी शहरातील मांजा विक्रेत्यांविरुध्द कारवाई केली. यामध्ये कुंभारगल्ली येथील तांबोळी यांच्या दुकानातून 20 हजार 400 तर मालदाड रोड येथील अमोल म्हस्के यांच्या दुकानातून 5 हजार 300 असा एकूण 25 हजार 700 रुपयांचा मांजा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणी दुकान मालक रुकैय्या समशोद्दीन तांबोळी (वय 60 रा. कुंभारगल्ली) व अमोल सुभाष -म्हस्के (वय 31 रा. मालदाडरोड) यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 290, 291, 188, पर्यावरण संरक्षण गुन्हा दाखल केला आहे.
